अमरावती : बडनेरा रेल्वे स्थानक परिसरातील नागपूर डाऊन रेल्वे ट्रॅकवर एका ४५ ते ५० वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. गुरुवारी (दि.२६) दुपारी ही घटना उघडकीस आली असून, हा मृत्यू अपघात आहे की घातपात, याबाबत रेल्वे वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २६) दुपारी रेल्वे पोलिसांना रुळावर एक मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच बडनेरा लोहमार्ग पोलीस (जीआरपी) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, मृतकाच्या शरीरावर रेल्वेतून पडल्याच्या किंवा ओढले गेल्याच्या कोणत्याही जखमा आढळून आल्या नाहीत. यामुळे या मृत्यूबाबतचे गूढ अधिक वाढले आहे.
मृतकाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आवाहन
मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी मृताचे वय: अंदाजे ४५ ते ५० वर्षे, उंची: ५ फूट ५ इंच, सावळा वर्ण, कपडे: अंगात राखाडी (ग्रे) रंगाचा टी-शर्ट तसेच डाव्या कानात पिवळ्या रंगाची बाली, हातात स्टीलचा कडा असून त्यावर 'नागेश' आणि 'मार्कस' अशी नावे कोरलेली आहेत, असे वर्णन केले आहे.
तपास यंत्रणा सतर्क
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) निरीक्षक आणि बडनेरा जीआरपीच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
संपर्क साधण्याचे आवाहन
या मृत व्यक्तीबाबत कोणालाही माहिती असल्यास किंवा वर्णन जुळत असल्यास नागरिकांनी ७९७२०८०४१२ किंवा ९८१९३८९२८५ या क्रमांकावर बडनेरा रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.