अमरावती : शहरातील पंचवटी चौकात इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे फलक लावण्यात आल्यापासून सुरू झालेला वाद आता तीव्र होत चालला आहे. या फलकांना विरोध दर्शविल्यानंतर भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांना हैदराबाद येथून धमकीवजा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील तक्रार १६ जानेवारी रोजी राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.
खासदार बोंडे यांनी मुख्य चौकांमध्ये परवानगीशिवाय धार्मिक प्रचाराचे फलक कसे लावले जातात, असा सवाल उपस्थित केला होता. त्यांच्या या भूमिकेनंतर काही तासांतच त्यांना धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
प्राप्त ई-मेलमध्ये बोंडे यांनी इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरविरोधात केलेल्या विधानांमुळे हैदराबादमधील मुस्लिम समाजात तीव्र नाराजी निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्या वक्तव्यांमुळे ‘तेथील वातावरण तंग झाले असून धार्मिक भावना दुखावल्या’ असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.
यापुढे ई-मेलमध्ये चेतावणी देत म्हटले आहे की, “आपल्या वक्तव्यांमुळे समुदायाच्या भावना जखमी झाल्या आहेत. परिस्थिती एका ठिणगीवर वणव्यासारखी पेटू शकते. त्यामुळे आपल्या भाषेला आवर घाला; एक चुकीचा शब्दही गंभीर परिणाम घडवू शकतो.” ई-मेलच्या शेवटी ‘हैदराबादची नाराज मुस्लिम बिरादरी’ अशी सही करण्यात आली आहे.
अमरावतीच्या पंचवटी चौकात तीन दिवसांपूर्वी इस्लामचा प्रचार करणारे फलक लावण्यात आले होते. या फलकावर आक्षेप घेत खासदार अनिल बोंडे यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी करत मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा गंभीर आरोप केला होता. या माध्यमातून हिंदू तरुणाईचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले होते. या भूमिकेमुळेच हैदराबाद येथून धमकीचा ई-मेल मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. राजापेठ पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.