अमरावती, पुढारी वृत्तसेवा: सरकार एक रुपयात पिक विमा देते मात्र याचा गैरफायदा काही लोकांनी घेतला आहे. पिक विमा योजना यशस्वी व्हावी, योग्य त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. पण आजकाल भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, असे वादग्रस्त विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अमरावतीत शुक्रवारी (दि.१४) केले आहे. अमरावतीत कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनादरम्यान ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पिक विमा संदर्भात चांगले वाईट अनुभव सरकारच्या पाठीशी आहेत. पिक विमा कंपन्या लुटमार करतात. सरकारला पिक विमा बंद करायचा नाही. मात्र पिक विमा योजनेतील गैरप्रकार थांबविण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील. या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत निर्णय घेण्यात येईल,अशी माहिती देखील कृषिमंत्री कोकाटे यांनी दिली.
सरकार एक रुपयात पिक विमा देते म्हणून काही लोकांनी गैरप्रकार सुरू केले. बाहेरच्या राज्यातील लोकांनी देखील ऑनलाइन अर्ज दाखल केले. त्यामुळे अर्ज खूप साचले. पिक विमा योजना खूप चांगली आहे, असे वाटत होते म्हणून आम्ही चौकशी केली. त्यामध्ये चार लाख अर्च नामंजूर करण्यात आले. सरकार कुठेही अडचणीत आलं नाही. अशाप्रकारे अर्ज भरले जात असल्यामुळे सीएससी केंद्र चालक असले उद्योग करतात का, याची चौकशी करून कारवाई केली जाईल,असेही त्यांनी सांगितले.
कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता आकृतीबंध तयार करून नवीन भरती संदर्भात शासन विचार करेल असे देखील ते एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाले. कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांशी शेतकऱ्यांचा संपर्क व्यवस्थित व्हावा म्हणून एका सिरीज मध्ये नंबर देण्यात येणार आहे. कृषीमंत्र्यांपासून तर विभागातील शेवटच्या कर्मचारी पर्यंत हा पर्मनंट नंबर राहणार आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.