अमरावती, पुढारी वृत्तसेवा : जय श्रीरामच्या घोषणा देत आज (दि. ७) सकाळी पाच वाजता अमरावती रेल्वे स्थानकावरून जिल्ह्यातील 1507 राम भक्तांना घेऊन 'आस्था एक्सप्रेस' अयोध्येला रवाना झाली. खासदार अनिल बोंडे यांनी या गाडीला भगवा झेंडा दाखवला. अमरावतीवरून अयोध्येला जाणाऱ्या राम भक्तांमध्ये यावेळी प्रचंड उत्साह होता.
अमरावतीसह अचलपूर, धारणी, चिखलदरा, तिवसा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे, मोर्शी, वरुड अशा सर्वच तालुक्यातून अयोध्येला जाण्यासाठी राम भक्त मंगळवारी रात्रीपासूनच अमरावती रेल्वे स्थानकावर पोहोचले होते. रात्री रेल्वे स्थानकावर राम भक्तांनी भजन केलं. पहाटे तीन वाजल्यापासून अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांची लगबग रेल्वेस्थानकावर सुरू झाली. अयोध्याला जाणाऱ्या सर्व राम भक्तांना टिळा लावून त्यांच्या गळात तुळशी माळा घालण्यात आल्या. त्यानंतर सकाळी पाच वाजता राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यासह भाजपच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी या गाडीला भगवा झेंडा दाखवून आस्था स्पेशल ट्रेन अयोध्येच्या दिशेने रवाना झाली.
यावेळी माजी आमदार रमेश बुंदिले, आस्था स्पेशल ट्रेनचे संयोजक राजेश पाठक, सरचिटणीस नितीन गुडधे-पाटील, विवेक गुल्हाने, राजेश वानखडे, ज्येष्ठ विधीतज्ञ प्रशांत देशपांडे, दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुलकर्णी, निवेदिता चौधरी, प्रवीण तायडे, गोपाल चंदन, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अनिता तिखिले, ज्योती मालवे- सोळंके, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य वानखडे, निलेश शिरभाते, दत्तात्रय गेडाम, निषांत जोध, कर्ण धोटे, विशाल माहुलकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.
अमरावती रेल्वे स्थानकावरुन आज सकाळी पाच वाजता निघालेली 'आस्था एक्सप्रेस' अयोध्येला गुरुवारी सकाळी आठ वाजता पोहोचणार आहे. 27 तासांच्या या प्रवासाला अमरावती जिल्ह्यातील 1507 राम भक्त निघाले असून त्यांच्या सेवेसाठी रेल्वेचे एकूण 56 कर्मचारी गाडीमध्ये आहेत. या गाडीत मधात कुठंही प्रवासी बसणार नाहीत. मात्र अमरावती रेल्वे स्थानकावरुन निघाल्यावर ही गाडी वर्धा, नागपूर आणि इटारसी रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. 10 फेब्रुवारीला रात्री दहा वाजता ही गाडी या प्रवाशांना घेऊन पुन्हा अमरावतीकडे निघणार आहे.
हेही वाचा