बच्चू कडू  File Photo
अमरावती

दिव्यांग कल्याण विभागाचा बच्चू कडू यांनी दिला राजीनामा

Bacchu Kadu | दिव्यांगांच्या मागण्यांसाठी आंदोलनाच्या तयारीत

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : देशातील आणि राज्यातील पहिलेच दिव्यांग मंत्रालय स्थापन करून त्याच्या अध्यक्षपदाचा मान बच्चू कडू यांना देण्यात आला होता. बच्चू कडू यांचा विधानसभेत पराभव झाल्यानंतर आणि संबंधित मंत्रालयाचे कामकाज पुढे सरकत नसल्यामुळे सरकारवर नाराजी व्यक्त करत बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियान (मंत्रालय दर्जा) या विभागाचा तडकाफडकी राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला आहे. दरम्यान त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आभार व्यक्त केले आहे.

राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी सरकारच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. राज्य सरकार दिव्यांगांच्या विविध मागण्यांबाबत गांभीर्याने विचार करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. दिव्यांगांसाठी आपण आंदोलन करणार असून पदावर राहून आंदोलन करता येत नसल्याने आपण हा राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले आहे.

बच्चू कडू यांच्या पाठपुराव्याने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर 2022 मध्ये स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय निर्मितीची घोषणा केली होती. बच्चू कडू यांची या विभागाच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली होती. पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कडू यांनी दिव्यांगांसाठी विविध उपाययोजना सुचविल्या होत्या. मात्र राज्य शासनाकडून त्याची फारशी दखल घेण्यात आली नाही.

बच्चू कडू यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये महाराष्ट्रात दिव्यांगांना इतर राज्यांच्या तुलनेत कमी मिळणाऱ्या मानधनात वाढ करावी, मानधन वेळेवर मिळावे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांसाठी राखीव असणारा 5% निधी योग्यरीत्या वापरावा, खात्यासाठी स्वतंत्र मंत्रीपद निर्माण करावे, जिल्ह्यांच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यालये उभारावीत, इत्यादि मागण्यांचा समावेश होता. मात्र यापैकी कुठलीही मागणी पूर्ण झाली नाही आणि भविष्यात ती पूर्ण होण्याची शक्यता नसल्याची खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

सरकारी सुरक्षाही नाकारली

या पदावर राहून आपण दिव्यांगांना न्याय देऊ शकत नाही, त्यांच्यासाठी आपल्यालाच आंदोलन करावी लागणार आहेत. त्यामुळे आपण या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच आपल्याला देण्यात आलेली सरकारी सुरक्षाही काढून टाकण्यात यावी,अशी मागणी करून त्यांनी सरकारच्या निष्क्रियतेविषयी आपला संताप व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT