अमरावती : "शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. आमची गांधीगिरी आता संपली असून, भगतसिंगगिरी सुरू झाली आहे. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली नाही, तर आमचे पुढचे आंदोलन थेट मंत्रालयावर धडकेल," अशा आक्रमक शब्दांत प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख, आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे.
बच्चू कडू यांच्या नेतृत्वात गुरुवारी (दि.२४) शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात 'चक्काजाम' आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनामुळे राज्याच्या अनेक भागांतील वाहतूक ठप्प झाली होती.
अमरावती-परतवाडा मार्गावर झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांना संबोधित करताना बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "हे सरकार केवळ उद्योगपतींचे आहे, त्यांना शेतकऱ्यांच्या सुख-दुःखाशी काहीही देणेघेणे नाही. शेतकऱ्यांच्या हमीभावावर सरकार बोलायला तयार नाही. केवळ समित्या स्थापन करण्याचे नाटक केले जाते आणि समिती स्थापन झाल्यावरही कोणतीही ठोस कारवाई होत नाही."
बच्चू कडू यांच्या आवाहनानंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात प्रमुख महामार्ग रोखून धरले. अमरावती-नागपूर महामार्गावरही तीव्र आंदोलन करण्यात आले, ज्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. काही ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या आंदोलनात प्रहारसोबतच अनेक समविचारी पक्ष आणि संघटनांनीही सहभाग घेतला. या आंदोलनाद्वारे सरकारने शेतकऱ्यांना सरसकट आणि तात्काळ कर्जमाफी जाहीर करावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव (MSP) द्यावा आणि दिव्यांग बांधव, शेतमजूर आणि मेंढपाळ समाजाच्या प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकरी, दिव्यांग, शेतमजूर आणि मेंढपाळ बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. सरकारने मागण्या मान्य न केल्यास भविष्यात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.