अमरावती : अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजित तायडे यांच्या तक्रारीवरून चांदूर बाजार पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा कट रचल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ति पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकार आणि पोलीस प्रशासनावर शुक्रवारी (दि.३) जोरदार पलटवार केला आहे. "आम्ही कुणाची हत्या करण्याचा कट रचला नसून, उलट आमच्या विरुद्धच राजकीय कट रचला गेला आहे," अशा शब्दांत त्यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
बच्चू कडू म्हणाले की, आगामी काळात आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोठे आंदोलन छेडण्याच्या तयारीत होतो. मात्र, हे आंदोलन दडपण्यासाठी आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात रोज कितीतरी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स फिरत असतात, मात्र त्यावर साधी कारवाई होत नाही. मग केवळ तक्रारदार हा आमदाराचा नातेवाईक आहे म्हणून पोलीस अधीक्षक एवढ्या तत्परतेने गुन्हे दाखल कसे करतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जिल्हाभरात अनेक गुन्हेगारी घटना घडत असताना त्यावर कारवाई होत नाही, पण चार महिने जुन्या प्रकरणावरून राजकीय द्वेषापोटी ही कारवाई केली जात असल्याचा आरोप कडू यांनी केला. "डिसेंबरमधील कथित प्रकरण एप्रिलमध्ये बाहेर काढले जाते, यावरूनच हे सर्व नियोजित असल्याचे स्पष्ट होते. सत्ता तुमची, एसपी तुमचा आणि फॉरेन्सिक लॅबही तुमचीच आहे, त्यामुळे तुम्ही चुटकीसरशी कोणालाही फसवू शकता," असेही ते म्हणाले.
अटक झाली तर राम मंदिरातून होईल
जर अशा प्रकारे खोटे कट रचून गुन्हे दाखल केले जात असतील, तर आम्ही अटकेला घाबरत नाही. आम्ही अटक होण्यासाठी तयार आहोत, पण लक्षात ठेवा, जर अटक झालीच तर ती थेट राम मंदिरातून होईल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. आम्ही समाजासाठी रक्तदान करणारे लोक आहोत, कोणाचा जीव घेणारे नाही. अशा प्रकारच्या दबावामुळे आम्ही मागे हटणार नाही. शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी आमचा लढा असाच सुरू राहील, असेही बच्चू कडू यांनी सांगितले. या प्रकरणाने आता अमरावतीच्या राजकारणात नवीन वळण घेतले असून, प्रहार विरुद्ध भाजप असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.