अमरावती : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात सोशल मीडियावर अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ व्हायरल केल्याच्या गंभीर प्रकरणाने खळबळ उडाली असून, पोलिसांनी आतापर्यंत ४ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात तब्बल ८ पीडित मुलींचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो आढळून आल्याने गुन्ह्याची व्याप्ती अधिकच भीषण असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या प्रकरणात अद्याप कुठल्याही पीडित महिलेने किंवा मुलीने तक्रार दिलेली नाही. पोलिसांनी पुढे येऊन तक्रार देण्याचे आवाहन केले आहे.
प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद (वय १९, परतवाडा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २९४, तसेच पोक्सो कायदा (कलम ८, १२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० (कलम ६७, ६७-अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
तपासात आरोपी अयानने हे व्हिडिओ त्याचा मित्र उजेर खान (वय २०, अचलपूर) याला पाठवले असल्याचे निष्पन्न झाले. पुढे उजेरने हे व्हिडिओ मो. साद (वय २२) आणि तरबेज खान (वय २४) यांना व्हॉट्स अॅपवर शेअर केले. या तिघांनीही व्हिडिओ पुढे प्रसारित केल्याचे उघड झाल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे. याशिवाय, टेलिग्रामद्वारेही व्हिडिओ पाठवण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा झाला असून संबंधित व्यक्तीलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
मुख्य आरोपी अयानने अमरावतीतील एका मित्राच्या भाड्याच्या घरात पीडित मुलींचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिली आहे. त्या अनुषंगाने संबंधित व्यक्तीलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
आतापर्यंत या प्रकरणात ५ मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यांची न्यायवैद्यकीय (फॉरेन्सिक) तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय आणखी ४ संशयितांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
अयान अहमदचा 'रील' रुबाब अन् लैंगिक शोषणाचं काळं कृत्य : १८ व्हिडिओ व्हायरल, एसआयटीकडून तपास सुरू
परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, मुख्य आरोपी अयान अहमद याच्या गुन्हेगारी कृत्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महागड्या कार आणि सोशल मीडियावरील 'रील्स'च्या माध्यमातून तरुणींना जाळ्यात ओढणार्या या 'रोड रोमिओ'ने अनेक अल्पवयीन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आता विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.
अयान अहमद हा कोणताही कामधंदा न करता वडिलांच्या 'ऑटो डील' व्यवसायातील जुन्या महागड्या कार वापरून शहरात बडेजाव मिरवत असे. याच गाड्यांमधून फिरणे आणि सोशल मीडियावर रील बनवून तरुणींवर प्रभाव पाडणे ही त्याची कार्यपद्धती होती. प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर तो तरुणींचे लैंगिक शोषण करायचा आणि त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ व फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करायचा. तपासादरम्यान आरोपीने ८ अल्पवयीन मुलींचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपीच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला आहे.
या प्रकरणात अद्याप कोणतीही पीडित महिला किंवा पालक अधिकृत तक्रार देण्यासाठी पुढे आलेले नाहीत. त्यामुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पीडितांनी न घाबरता महिला अधिकार्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. माहिती देणार्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सायबर पोलीस आता या प्रकरणातील 'डिजिटल पुराव्यांची' कसून चौकशी करत असून गुन्ह्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या प्रकरणातील पीडितांमध्ये मुस्लीम तरुणींचाही समावेश असल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून उद्या आयोगाचे पथक परतवाडा येथे भेट देणार आहे. दुसरीकडे, स्थानिक मुस्लीम संघटनांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. काजी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने पोलिसांना निवेदन दिले असून, 'अशा नराधमाला धर्माच्या चष्म्यातून न पाहता भरचौकात कठोर शिक्षा द्या,' अशी मागणी केली आहे.