अप्पर वर्धा धरणाचे १३ पैकी ९ दरवाजे ४० सेंटिमीटरने उघडण्यात आले Pudhari
अमरावती

Upper Wardha Dam | अप्पर वर्धा धरणाची ९ दरवाजे उघडली; सतर्कतेचा इशारा

Amravati Rain News | पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस, पर्यटकांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

Upper Wardha dam water release

अमरावती : जिल्ह्यातील मोर्शी येथील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाचे शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी १३ पैकी ९ दरवाजे ४० सेंटिमीटरने उघडण्यात आले असून त्यामधून आता ५७७ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. सध्या अप्पर वर्धा धरणात ४८२ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा येवा सुरू असून त्यामधून ५७७ घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

अप्पर वर्धा धरणातील पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून मध्यप्रदेशातील सालबर्डी येथून वाहणारी माडू नदी तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

अमरावती जिल्ह्याला वरदान ठरणार्‍या मोर्शीपासून अवघ्या ८ किमी अंतरावर असलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील माडू नदीला मोठा महापूर आल्यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे तसेच वर्धा नदीखालील भागातील नदी नाले इत्यादींचा विसर्ग नदीच्या पात्रामध्ये राहणार असल्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अपेक्षित पर्जन्यमानाचा विचार करता तसेच धरणामध्ये येणार्‍या येव्यानुसार जलाशय प्रचलन सूची नुसार विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडण्यात आला आहे.दि. २८ ऑगस्ट रोजी रोजी दुपारी १ वाजता पाण्याच्या साठ्याची टक्केवारी ९१.७५ टक्के एवढी होती.अप्पर वर्धा धरणाची निर्धारित पाण्याची पातळी ३४२.५० मिलिमीटर एवढी ठेवण्यात आली असून सध्या ही पातळी ३४२.०५ मिलिमीटर झाली आहे.त्यामुळे जवळपास ९२.६७ टक्के धरण भरलेले आहे.

आता अप्पर वर्धा धरणाचे १३ पैकी ९ दरवाजे उघडण्यात आल्यामुळे हे विहंगम दृश्य बघण्यासाठी व पाण्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी पर्यटकांनी अप्पर वर्धा धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. त्यादृष्टीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.गेल्या वर्षी अप्पर वर्धा धरणाची १३ पैकी ३ गेट दि.५ ऑगस्ट रोजी उघडण्यात आली होती.त्यानंतर पाण्याचा येवा बघता दि.१४ ऑगस्ट रोजी १३ पैकी ११ वक्रद्वार उघडण्यात आली होती. या ठिकाणी रंगीबेरंगी आकर्षक रोषनाईने पर्यटकांच्या डोळ्यात भुरळ घातली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी कोसळल्यामुळे अप्पर वर्धा धरणाची गेट उघडण्यास विलंब झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT