अमरावती

Amravati Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; भांबोरा येथील घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : मोर्शी तालुक्यातील भांबोरा येथे वाघाच्या हल्ल्यात एका ५२ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २७ ऑगस्ट रोजी घडली. चरणदास वासुदेवराव इखे (वय ५२, रा. भांबोरा) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण मोर्शी तालुक्यात भीतीचे सावट पसरले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चरणदास इखे हे सकाळी ८ वाजताच्या सुमारास पत्नी व मुलासह बैलगाडीने शेतात गेले होते. स्वतःच्या शेतालगत असलेले दुसरे शेत त्यांनी लागवडीने (कसेल त्याने) घेतले होते. पत्नी आणि मुलगा एका शेतात काम करत असताना, चरणदास हे लागवडीच्या शेतात कपाशी निंदण्याचे काम करत होते. निंदण करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला चढवला आणि त्यांचा गळा पकडून त्यांना जवळपास २०० फुटांपर्यंत फरफटत नेले.

काही वेळाने मुलगा वडिलांना नाश्त्यासाठी बोलवायला गेला असता, त्याला घटनास्थळी निंदणाच्या विळ्याला रक्त आणि फरफटत नेल्याच्या खुणा आढळल्या. घाबरलेल्या मुलाने तातडीने आरडाओरड केली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मोठा आवाज केल्याने वाघाने चरणदास यांना बाजूच्या नाल्यात सोडून जंगलात पळ काढला. मात्र, गंभीर जखमांमुळे चरणदास यांचा जागीच मृत्यू झाला होता. शेतकऱ्यांनी त्यांचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढून तत्काळ मोर्शी पोलिसांना माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक, वनपरिक्षेत्र अधिकारी भुजाडे, तहसीलदार सागर ढवळे, आरती वानखडे आणि पोलीस पाटील मीनाक्षी साबळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी येथे पाठवला.

२० वर्षीय युवक थोडक्यात बचावला

सकाळी ९ वाजताच्या सुमारास भांबोरा येथील प्रज्वल कुरवाळे (वय २०) हा युवक शेतातील फवारणीसाठी नदीपात्रातून पाणी आणायला गेला होता. त्यावेळी त्याला पाठीमागून वाघ येत असल्याचे दिसले. त्याने तत्काळ प्रसंगावधान राखत थेट नदीच्या पाण्यात उडी मारली आणि दुसऱ्या तीराने पळ काढल्यामुळे त्याचा जीव थोडक्यात वाचला.

मोर्शी तालुक्यात वन्यजीवांचा वावर आणि हल्ल्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असूनही वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT