अमरावती : चिखलदरा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले निलंबित हेड कॉन्स्टेबल दीपक सोनाळेकर (वय ४७) यांचा कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.१८) रात्री चिखलदरा-ओशो पॉइंट मार्गावर घडली.
दीपक सोनाळेकर हे कार (क्र. एमएच ४० ई ०१११) या कारने चिखलदरा पोलिस ठाण्यात प्रलंबित कामकाजाच्या डायऱ्या व इतर कामासाठी आले होते. रात्री १० च्या सुमारास काम आटोपून परत जात असताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावर आदळली. अपघाताच्या वेळी त्यांच्या छातीवर जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हा अपघात झाल्यानंतर सोनाळेकर जवळपास दीड तास कारमध्ये अडकले होते. त्यावेळी या मार्गावरून वर्दळ नसल्यामुळे त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत सोनाळेकर यांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. सोनाळेकर हे चिखलदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेट्याखेडा प्रकरणात निलंबित होते. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे पोलिस दलात तसेच त्यांच्या कुटुंबीय आणि सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.