अमरावती : विद्यार्थिनीला बळजबरीने काढलेले छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना शहरातील राजापेठ हद्दीत उघडकीस आली. २० डिसेंबर रोजी राजापेठ पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार पिडित मुलीने नोंदविली आहे. त्यानुसार आरोपी तरुण चेतन (वय २३, रा. फुबगाव, चांदुरबाजार) याच्या विरुद्ध विविध कलमान्वये पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिडित मुलगी ही शहरातील एका महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेत आहे. ती एसटी बस ने महाविद्यालयात ये-जा करते. दरम्यान तिची ओळख चेतनसोबत झाली होती. त्यानंतर चेतन तिला अधुनमधून पंचवटी चौकात भेटत होता. एके दिवशी चेतन तिला भेटायला गेला आणि तु मला आवडतेस, असे म्हणून त्याने विद्यार्थिनीला त्रास देणे सुरू केले. त्याने विद्यार्थिनीला धमकी देखील दिली. त्यामुळे विद्यार्थिनी घाबरली होती.
त्याच्या सांगण्याप्रमाणे ती तपोवनेश्वर येथे भेटण्यास गेली. यावेळी आरोपी युवकाने विद्यार्थिनीला तिची इच्छा नसताना साडी घालण्यास लावली आणि तिच्यासोबत मोबाईलमध्ये छायाचित्र काढले. त्यानंतर चेतनने फोटोचा आधार घेऊन फोटो इन्स्ट्राग्राम, फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी विद्यार्थिनीला दिली. त्यामुळे भितीपोटी ती तरुणी चेतन सांगेल तसे करू लागली. चेतनने विद्यार्थिनीला एका लॉजमध्ये नेले आणि तिच्या इच्छेविरुध्द अत्याचार केला तसेच त्याने मोबाईलमध्ये व्हीडीओ देखील काढला. त्यानंतरही चेतनने विद्यार्थिनीला रिलेशनशिप कायम ठेवण्यासाठी सतत त्रास दिला. त्यामुळे अखेर चेतनच्या त्रासाला कंटाळून पिडित विद्यार्थिनीने राजापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी युवका विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.