Death of Kalnibai Bhalavi
कालणीबाई भलावी या वृद्धेचा सोनोरी बस स्टॉपवर बस खाली सापडून मृत्यू झाला.  Pudhari News Network
अमरावती

मुलीच्या भेटीसाठी आलेल्या वृद्धेला बसने चिरडले, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: मुलीची भेट घेऊन घरी जाण्यासाठी बसची वाट पाहणाऱ्या एका वृद्ध महिलेला बसने चिरडल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात सोनोरी बस स्टॉपवर मंगळवारी (दि.९ ) घडली. कालणीबाई धड्डू भलावी (वय ७५, रा. बागवानी, आठनेर, जिल्हा बैतूल, मध्य प्रदेश) असे मृत वृद्धेचे नाव आहे.

बसच्या मागच्या चाकामध्ये सापडून कालिनीबाई यांचा मृत्यू

प्राप्त माहितीनुसार अपघातास कारणीभूत असलेली एसटी बस (एम एच १४ बीटी ०८९३) ही चांदुर बाजार येथून घाटलाडकी कडे जात होती. दरम्यान, सोनोरी बस स्टॉपवर प्रवाशांसोबत कालिनीबाई पण घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होत्या. दरम्यान, तेवढ्यात बस तेथे पोहोचली. सर्व प्रवासी बसमध्ये चढत होते. अशातच बसच्या प्रवेशद्वारावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या कालिनीबाई खाली पडल्या. त्याकडे चालकाचे लक्ष नव्हते. बस चालकाने निष्काळजी पणाने आपले वाहन समोर नेले. त्यामुळे कालिनीबाई त्या बसच्या मागच्या चाकामध्ये आल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आईला मृत पाहून मुलीचा आक्रोश

कालिनीबाई आपल्या मुलीला भेटण्यासाठी चांदूरबाजार तालुक्यातील सोनोरी येथे आल्या होत्या. भेट घेतल्यानंतर येथून परत घरी जात असताना त्यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांची मुलगी ममता रमेश उके ही सोनोरी गावात शेतमजूर म्हणून काम करते. आईच्या मृत्यूची बातमी मिळताच ती धावत धावत घटनास्थळी पोहोचली. आईला मृत पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. काही क्षणापूर्वीच भेटून घरी जाण्यासाठी निघालेली आई कायमची दुरावल्याने तिने एकच टाहो फोडला.

बसचालकावर अरेरावी व मनमानीचा आरोप

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार उल्हास राठोड तेथे पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह चांदूरबाजार उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मृत कालिणीबाईची मुलगी ममता रमेश उके हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी बसचालक अतुल नारायण पावसे (रा. गुणवंतवाडी, अमरावती) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्रवाशांनी बसचालकावर अरेरावी व मनमानीचा आरोप केला आहे.

SCROLL FOR NEXT