MSRTC Bus Accident
अमरावती : शिरजगाव मोझरी येथून अमरावतीकडे जाणारी एसटी बस (MH 40 Y 5183) चा धोत्रा ते सालोरा गावादरम्यान रस्त्यालगतच्या नाल्यात पलटून अपघात झाला. या दुर्घटनेत वाहकासह सुमारे २० प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
ब्रेक फेल झाल्याने व रस्ता अरुंद असल्याने हा अपघात घडल्याचे चालकाने सांगितले. स्थानिक नागरिकांनी तातडीने सर्व प्रवाशांना बाहेर काढले. जखमींपैकी १० जणांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमरावती विभागीय नियंत्रक संदीप शिरसागर यांनी घटनास्थळी भेट देऊन बसच्या तांत्रिक तपासणीनंतरच ब्रेक फेलचे कारण स्पष्ट होईल, असे सांगितले.
दरम्यान, या मार्गावरील खड्डे, अरुंद रस्ता आणि दुतर्फा वाढलेली झाडेझुडपे काढण्यासाठी ८ महिन्यांपूर्वी बेमुदत उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने २ महिन्यांत दुरुस्तीचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, तब्बल ८ महिने उलटूनही कोणतेही काम न झाल्याने प्रशासकीय निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी केला असून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.