अमरावती : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे एका 19 वर्षीय तरुणाचे सहा वेगवेगळ्या तरुणींसोबतचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या सेक्स स्कँडलचे गांभीर्य लक्षात घेऊन अमरावती ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवत मुख्य आरोपी अयान अहमद तनवीर अहमद याला सोमवारी (दि. 13) उशिरा रात्री अटक केली.
अनेक तरुणींना प्रेमजालात फसवून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केल्याचा आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून भाजपसह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी लावून धरली होती. या धक्कादायक प्रकारानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतला होता.
कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
या प्रकरणात मुलींचे व्हिडीओ तयार करून त्यांना वेश्या व्यवसायासाठी धमकावले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. प्रकरण उघडकीस येताच आरोपी अयान अहमद कुटुंबासह फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला शोधून काढत बेड्या ठोकल्या आहेत. याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांना दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.