अमरावती : जागतिक स्तरावरील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी हुआवेईने (Huawei) आपल्या नव्या अमेरिकन पेटंटमध्ये अमरावतीचे ज्येष्ठ संशोधक डॉ. विजय तुळशीराम इंगोले यांच्या संशोधनाचा अधिकृत संदर्भ दिला आहे. त्रिमूल्य संगणन (Ternary Computing) या क्षेत्रातील त्यांच्या संशोधनाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली असून, हुआवेईच्या या पेटंटच्या संदर्भ यादीत स्थान मिळवणारे डॉ. इंगोले हे एकमेव भारतीय संशोधक ठरले आहेत.
हुआवेईचे 'टर्नरी लॉजिक गेट सर्किट, कम्प्युटिंग सर्किट चिप अँड इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस' या शीर्षकाचे अमेरिकन पेटंट २३ जुलै २०२६ रोजी प्रकाशित झाले. या पेटंटमध्ये संदर्भ म्हणून डॉ. विजय इंगोले यांच्या 'टर्नरी अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट (ALU) अँड टर्नरी लॉजिक सर्किट' या संशोधनाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची मान्यता मिळाल्याचे मानले जात आहे.
डॉ. विजय इंगोले यांच्या संशोधनाची प्राधान्य तारीख ११ जून २०१५ असून, त्यांचे आंतरराष्ट्रीय पेटंट १५ डिसेंबर २०१६ रोजी प्रकाशित झाले होते. दुसरीकडे, हुआवेईच्या संबंधित संशोधनाची प्राधान्य तारीख सप्टेंबर २०२३ आहे. म्हणजेच, हुआवेईच्या संशोधनाच्या सुमारे आठ वर्षे आधीच डॉ. इंगोले यांनी त्रिमूल्य संगणनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले होते.
त्यांनी विकसित केलेल्या 'टर्नरी अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट' (TALU) मध्ये त्रिमूल्य लॉजिक गेटचा वापर करण्यात आला आहे. या प्रणालीच्या माध्यमातून बेरीज, कॅरी निर्मिती, तुलना यांसह विविध अंकगणितीय आणि तार्किक क्रिया करता येतात. त्यासाठी आवश्यक असलेल्या इलेक्ट्रॉनिक परिपथाची रचना या संशोधनात करण्यात आली आहे.
त्रिमूल्य संगणन तंत्रज्ञानाचा उपयोग भविष्यात संगणकीय प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी होऊ शकतो. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि प्रगत संगणकीय प्रणालींच्या विकासात अशा संशोधनाला महत्त्व प्राप्त होत आहे. डॉ. इंगोले यांच्या संशोधनाचा जागतिक तंत्रज्ञान कंपनीच्या पेटंटमध्ये संदर्भ आल्याने अमरावतीसह देशाच्या संशोधन क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
डॉ. विजय इंगोले यांच्या या संशोधनाबद्दल विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. डॉ. इंदिरा इंगोले, प्र. सु. हिरुरकर, पद्माकर लाड, विद्याधर इंगोले, डॉ. मनोहर खोडे आणि कुमार पाटील यांनी त्यांचे कौतुक करून पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.