Ratnapur Lake Youth Drowning Pudhari
अमरावती

Amravati Drowning | अमरावतीतील रत्नापूर तलावात २ तरुण बुडाले; एक मृतदेह सापडला

जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

पुढारी वृत्तसेवा

Ratnapur Lake Youth Drowning

अमरावती : मित्रांसोबत फिरण्यासाठी रत्नापूर तलावावर गेलेल्या तरुणांवर काळाने घाला घातला. बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रत्नापूर तलावात शुक्रवारी (दि. २) सायंकाळी दोन तरुण पाण्यात बुडाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यातील भावेश चव्हाण (वय १७, रा. गोपालनगर, अमरावती) याचा मृतदेह रात्री आठच्या सुमारास शोधण्यात आला. दुसर्‍या तरुणाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. भावेशचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

साईनगर, गोपाल नगर, विलासनगरसह शहरातील विविध भागातील सहा ते सात तरुण शुक्रवारी फिरण्यासाठी रत्नापूर तलाव परिसरात गेले होते. काही वेळ तलाव परिसरात घालवल्यानंतर काही तरुण पाण्यात उतरले. त्याचवेळी दोन तरुण अचानक पाण्यात बुडाले. डोळ्यांदेखत मित्र पाण्यात बुडाल्याचे पाहून सोबतच्या तरुणांमध्ये एकच गोंधळ उडाला.

घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने तलावात शोधमोहीम सुरू केली. अंधार वाढत असतानाही पाण्यात विविध ठिकाणी शोध घेण्यात आला. अखेर रात्री सुमारे आठ वाजता भावेश चव्हाणचा मृतदेह पथकाच्या हाती लागला. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर भावेशच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला.

काही वेळापूर्वी मित्रांसोबत फिरण्यासाठी घराबाहेर पडलेला भावेश मृतावस्थेत परतल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, तलावात बुडालेल्या दुसर्‍या तरुणाचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाची मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. बडनेरा पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT