अमरावती: शहराच्या वाहतुकीचा कणा आणि लाखो अमरावतीकरांची जीवनवाहिनी असलेला राजकमल रेल्वे उड्डाणपूल अत्यंत धोकादायक स्थितीत पोहोचला आहे. पुलाच्या खालच्या बाजूला मोठ्या भेगा पडल्या असून, सिमेंटचा थर कोसळू लागल्याने हा पूल अक्षरशः 'धोक्याच्या उंबरठ्यावर' उभा आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने गुरुवारी (दि.२४) रात्रीपासून या पुलावरील जड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद केली आहे.
पोलिसांनी तातडीने बॅरिकेड्स लावून वाहतूक वळवली असून, आता केवळ दुचाकी आणि कारसारख्या हलक्या वाहनांनाच येथून प्रवेश दिला जात आहे. या निर्णयामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीवर मोठा ताण आला आहे.
१९७१ साली बांधण्यात आलेल्या या पुलाला आता तब्बल ५५ वर्षे पूर्ण झाली आहेत. तत्कालीन तंत्रज्ञानानुसार दगड, चुना आणि रेती वापरून बांधलेल्या या पुलाचे तांत्रिक आयुष्य ४० ते ५० वर्षे इतकेच होते. पुलाने आपली कालमर्यादा ओलांडली असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही, त्याच्या पुनर्बांधणीकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. हा पुल १९७१ मध्ये दगड-चुन्याचा वापर करून उभारण्यात आला आहे. सद्यस्थितीत या पुलाला भेगा, सिमेंटचे पोपडे कोसळत आहेत. तांत्रिकदृष्ट्या ४०-५० वर्षे या पुलाचे आयुष्य असून, ते पूर्ण झाले आहे. तरीदेखील प्रशासकीय अनास्थेमुळे या पुलाचा वापर करणाऱ्या नागरिकांचे देखील हाल होत आहेत.
एकीकडे चित्रा चौक ते पठाण चौक हा उड्डाणपूल गेल्या ७ वर्षांपासून रखडलेला असताना, आता शहराच्या हृदयातील राजकमल पूलही बंद होण्याच्या मार्गावर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला धोक्याची पूर्वकल्पना असूनही, केवळ स्ट्रक्चरल ऑडिटची परवानगी घेण्यातच वेळ घालवला गेला. या प्रशासकीय आणि राजकीय उदासीनतेचा थेट फटका दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना बसत आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवांसाठीही हा मार्ग बंद झाल्यास मोठे संकट उभे राहू शकते.
सध्या प्रशासनाने १५ दिवसांसाठी डागडुजीचे काम हाती घेतले आहे. मात्र, ५५ वर्षे जुन्या आणि आयुष्यमान संपलेल्या पुलासाठी ही डागडुजी पुरेशी ठरेल का? की ही केवळ एक तात्पुरती मलमपट्टी ठरेल आणि भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता कायम राहील? असा संतप्त सवाल अमरावतीकर विचारत आहेत. शहराच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे हे उत्तम उदाहरण असल्याची टीका आता जोर धरू लागली आहे.