अमरावती : अमरावती रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी (दि. १९) सायंकाळी प्रवाशांना सोडण्यासाठी आलेली एक खाजगी स्कॉर्पिओ कार थेट मुख्य प्रवेशद्वार ओलांडून रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोहोचली. विशेष म्हणजे, त्यावेळी फलाटावर अमरावती-मुंबई अंबा एक्स्प्रेस उभी होती.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार वेगाने आणि अनियंत्रित पद्धतीने थेट गाडीच्या अगदी जवळ पोहोचली. अचानक फलाटावर चारचाकी गाडी पाहून प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रवाशांच्या सुरक्षेच्या नियमांनुसार कोणत्याही खाजगी वाहनाला फलाट क्षेत्रात प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही स्कॉर्पिओ कोणत्याही अडथळ्याविना थेट ट्रेनपर्यंत पोहोचल्याने स्थानकावरील प्रवेश नियंत्रण आणि सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या घटनेचे छायाचित्र आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानकावर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर या वाहनाला का अडवले गेले नाही? कोणतीही तपासणी न होता कार आत कशी शिरली? असे अनेक अनुत्तरित प्रश्न आता निर्माण झाले आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) अधिकारी आणि जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आरपीएफने संबंधित वाहन ताब्यात घेऊन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अत्यंत संवेदनशील आणि गर्दीच्या रेल्वे परिसरात इतकी मोठी सुरक्षा त्रुटी समोर आल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. सुरक्षा व्यवस्थेत नेमकी कुठे चूक झाली, याची सविस्तर चौकशी रेल्वे अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.