अमरावती

Amravati Python News : ७ फुटाच्या अजगरासह १० अंड्यांना जीवदान; अजगरासह अंडी मिळण्याची पहिलीच घटना

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : वन्यजीव संरक्षणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे एका मोठ्या अजगरासह त्याच्या १० अंड्यांना सुखरूप जीवदान मिळाले आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात दहिगाव येथील शेतशिवारात आज २७ मे रोजी ही थरारक आणि कौतुकास्पद घटना घडली. तिवसा तालुक्यातील सर्पमित्रांनी अतिशय कौशल्याने हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करून वन्यजीवांना वनविभागाच्या स्वाधीन केले.

दहिगाव येथील शेतकरी पुंजाराम शेंडे यांच्या शेतात आज खोदकाम सुरू होते. यावेळी अचानक जमिनीच्या भागात सापाची हालचाल होत असल्याचे तिथल्या कामगारांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने तिवसा येथील सर्पमित्र शुभम विघे यांना पाचारण करण्यात आले. शुभम विघे यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, तीव्र उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जमिनीच्या एका बिळात सुमारे ७ फूट लांबीचा अजगर आपल्या अंड्यांसह सुरक्षित आश्रयाला बसल्याचे दिसून आले.

अजगराचे रेस्क्यू करणे हे आधीच आव्हानात्मक काम असते, त्यातच तिथे त्याची अंडी असल्यामुळे अधिकच काळजी घेणे गरजेचे होते. सर्पमित्र शुभम विघे यांनी अत्यंत सावधगिरी बाळगत, अंड्यांना जराही इजा होऊ न देता ७ फुटांच्या अजगराला आणि त्याच्या सर्व १० अंड्यांना सुखरूपपणे बिळातून बाहेर काढले. या संपूर्ण मोहिमेत त्यांना ऋषभ शेंडे, जीवन शेंडे आणि यश विघे यांनी मोलाची मदत केली. या यशस्वी रेस्क्यूअनंतर तातडीने स्थानिक वनविभागाशी संपर्क साधून अजगर आणि ती १० अंडी त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

अंडी मिळण्याची पहिलीच घटना

सामान्यतः मानवी वस्तीत किंवा शेतात विविध प्रकारचे साप, त्यांची पिल्ले किंवा अंडी मिळण्याच्या घटना अनेकदा घडतात. अनेकदा अजगरही आढळून येतात. मात्र, एवढ्या मोठ्या विशालकाय अजगरासोबतच त्याची १० अंडी एकाच वेळी सुरक्षितपणे हस्तगत होण्याची ही भागातील बहुधा पहिलीच दुर्मिळ घटना मानली जात आहे. सर्पमित्रांच्या या यशस्वी आणि धाडसी कामगिरीमुळे सर्वच स्तरातून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT