अमरावती

Amravati Legislative Council Election: प्रवीण पोटे यांनी भरला उमेदवारी अर्ज; राणा दाम्पत्याच्या अनुपस्थितीने राजकीय चर्चांना उधाण

चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अधिकृत उमेदवार म्हणून प्रवीण पोटे यांनी सोमवारी (दि. १) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. मात्र, महायुतीचे घटक पक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले असून, महायुतीत 'आलबेल' नसल्याचे बोलले जात आहे.

प्रवीण पोटे यांच्या उमेदवारीवर रविवारी रात्री शिक्कामोर्तब झाले होते. त्यानुसार आज अर्ज भरताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संजय खोडके व सुलभा खोडके, शिवसेनेचे (शिंदे गट) नेते व आमदार बच्चू कडू, माजी खासदार आनंदराव अडसूळ, भाजप आमदार राजेश वानखडे आणि प्रताप अडसड यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

राणा दाम्पत्य अनुपस्थित का?

प्रवीण पोटे यांच्या उमेदवारीला राणा दाम्पत्याने सुरुवातीपासूनच जोरदार विरोध दर्शवला असल्याचे बोलले जात आहे. महायुतीचे घटक पक्ष असल्याने राणा दाम्पत्य अर्ज भरताना उपस्थित राहील, अशी पोटे समर्थकांना आशा होती. परंतु, अमरावतीतील एका कार्यक्रमानंतर आमदार रवी राणा आणि नवनीत राणा हे दोघेही दिल्लीला रवाना झाले. ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळीच ते दिल्लीत असल्याने, त्यांची नाराजी अद्याप कायम असल्याची चर्चा अमरावतीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

राणा दाम्पत्याच्या नाराजीबाबत विचारले असता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिस्थिती सावरून घेण्याचा प्रयत्न केला. बावनकुळे म्हणाले, "माझी आज सकाळीच रवी राणा यांच्याशी चर्चा झाली आहे. ते दोघे सध्या अमरावतीत नाहीत. मी स्वतः त्यांना सोबत घेऊन अर्ज भरण्यासाठी येणार होतो, परंतु ते दिल्लीला गेले आहेत. ते परत आल्यानंतर माझ्याशी चर्चा करतील. दोन्ही नेते प्रगल्भ असून स्थानिक पातळीवर काही मतभेद असले, तरी ते महायुतीसोबतच राहतील."

भाजप उमेदवार प्रवीण पोटे यांनी महायुतीच्या शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला असला, तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राणा दाम्पत्याची ही अनुपस्थिती महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार का, की स्थानिक पातळीवरील हे मतभेद लवकरच निवळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT