Amravati bulldozer action Pudhari
अमरावती

Amravati Video Case | परतवाडा अश्लील व्हिडिओ प्रकरण: आतापर्यंत ४ आरोपी जेरबंद; मुख्य आरोपी अयानच्या घरावर 'बुलडोझर' कारवाई

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अचलपूर परतवाडा शहर बुधवारी कडकडीत बंद ठेवण्यात आले

पुढारी वृत्तसेवा

Amravati Paratwada video case

अमरावती : परतवाडा अचलपूर या जुळ्या शहरासह संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या अश्लील व्हिडिओ प्रकरणात पोलिसांनी आता तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद आणि उजेर खान यांच्यानंतर आता सहाद आणि तबरेज या आणखी दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामुळे या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता ४ वर पोहोचली आहे. दरम्यान या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अचलपूर परतवाडा शहर बुधवारी कडकडीत बंद ठेवण्यात आले. व्यापारी व स्थानिक नागरिकांनी या बंदला पूर्ण पाठिंबा दिला. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली.

आरोपीचे घर जमीनदोस्त

अचलपूर-परतवाडा शहरात गुन्हेगारांविरुद्ध अशी कठोर कारवाई करण्यात आली आहे. अनेक अल्पवयीन मुलींना प्रेमजाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या मुख्य आरोपी अयान अहमदच्या घरावर बुधवारी (दि.१५) नगरपरिषद प्रशासनाने बुलडोझर चालवला. स्थानिक आमदार प्रवीण तायडे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने हे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना

प्रकरणाचे गांभीर्य आणि जनक्षोभ लक्षात घेता, अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार (IPS) यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. या पथकात १० पोलीस अधिकारी आणि ३६ अंमलदारांचा समावेश असून, परतवाडा पोलीस सध्या शहरात जबरदस्त सर्च ऑपरेशन राबवत आहेत.

अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांचे कॉल रेकॉर्ड्स आणि संपर्क सूत्रांची कसून चौकशी सुरू आहे. आरोपींच्या संख्येत वाढीची शक्यता आहे. प्राथमिक तपासानुसार या रॅकेटमध्ये आणखी काही तरुणांचा सहभाग असण्याची शक्यता असून, लवकरच आणखी काही अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्या प्रकरणी परतवाडा पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला मंगळवारी रात्री अटक केली होती. या दोघांनी आठ अल्पवयीन मुली व महिलांचे व्हिडिओ व फोटो समाज माध्यमांवर प्रसारित केल्याचे तपासात समोर आले, अशी माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली. दरम्यान गुरुवारी या प्रकरणातील आणखी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता चार झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT