अमरावती

Amravati News : चालत्या इलेक्ट्रिक कारला अचानक आग; एक जण जखमी

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : आष्टी येथील एकविरा नर्सरीजवळ रविवारी (दि. १९) रात्री चालत्या इलेक्ट्रिक फोर व्हीलरला अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. या दुर्घटनेत गाडीतील एक जण जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही इलेक्ट्रिक कार ज्ञानेश्वर खडके यांच्या मालकीची आहे. रविवारी रात्री ही गाडी अमरावतीहून सुमारखेडा येथे जात असताना, एकविरा नर्सरीजवळ अचानक गाडीतून धूर निघू लागला आणि पाहता-पाहता गाडीने पेट घेतला.

गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच, गाडीत प्रवास करणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी तत्काळ बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. वेळेत बाहेर पडल्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली; मात्र या धावपळीत एक जण जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गाडीला आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. निलेश टपके यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तातडीने धावपळ करत नर्सरीमधील पाण्याच्या पाईपच्या साहाय्याने गाडीवर पाण्याचा मारा केला आणि आग आटोक्यात आणली.

नागरिकांनी आग विझवली असली, तरी या भीषण आगीत वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. चालत्या इलेक्ट्रिक कारला आग नेमकी कोणत्या कारणामुळे (शॉर्ट सर्किट किंवा बॅटरी ब्लास्ट) लागली, याचे अचूक कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. संबंधित यंत्रणेकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT