अमरावती महापालिकेत सापडला तोतया कनिष्ठ लिपिक Pudhari File Photo
अमरावती

Amravati News | अमरावती महापालिकेत सापडला तोतया कनिष्ठ लिपिक

बांधकाम विभागात होता कार्यरत

पुढारी वृत्तसेवा

अमरावती - महानगरपालिकेमध्ये गेल्या अडीच वर्षापासून बांधकाम विभागात कार्यरत तोतया कनिष्ठ लिपिक ओम पांडुरंग पाटील (वय २९,छांगानी नगर )याला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अडीच वर्षापासून तो बांधकाम विभागामध्ये कार्यरत होता. मात्र यादरम्यान एकाही वरिष्ठ अधिकार्‍याचे त्याच्याकडे लक्ष गेले नाही, हे विशेष.

दरम्यान त्याच्यावर संशय आल्याने मनपा अधिकार्‍यांनी त्याची तक्रार कोतवाली पोलिसांना दिली. या आधारे गुरुवारी (दि.१३) त्याला अटक करण्यात आली आहे. बांधकाम विभागामध्ये ओम पाटील नावाच्या कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती कनिष्ठ लिपिक पदावर करण्यात आली नसताना तो तिथे कार्यरत होता. त्यामुळे या प्रकरणाने पुन्हा एकदा मनपाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अधिक माहितीनुसार, ओम पाटील याने सॅलरी स्लिप दाखवून मनपा कर्मचार्‍यांप्रमाणे आयकार्ड बनवले होते. मात्र या नावाचा एक व्यक्ती आधीपासूनच मनपा झोन क्रमांक पाचमध्ये कार्यरत आहे. यानंतरही त्याने आयडी कार्ड बनवले, त्याच्यावर उपायुक्त यांची स्वाक्षरी आणि स्टॅम्प सुद्धा घेतले. गेल्या दोन वर्षापासून तो कार्यरत होता. महापालिकेमध्ये कार्यरत काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांना त्याच्यावर संशय आला. यामुळे त्यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ओम पाटील याला महापालिका परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्या बोगस नियुक्तीचे बिंग फुटले आहे. मात्र महापालिका वर्तुळात सध्या वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहे.

आयडी कार्ड बनवणारा संशयाच्या भोव-यात

माहितीनुसार मनपा कर्मचार्‍यांचे आयडी कार्ड बनविण्याचा कंत्राट तिवारी नामक व्यक्तीला दिलेला आहे. त्यानेच ओम पाटीलचे कनिष्ठ लिपिक म्हणून आयडी कार्ड बनवले. यानंतर पोलिसांनी कंत्राटदार तिवारी सोबत चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, ओम पाटील याने त्यांना नियुक्तीपत्र आणि सॅलरी स्लिप दाखवली. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी हे आयडी कार्ड बनवून दिले. आता पोलीस ओम पाटीलची चौकशी करत आहेत. उपायुक्त गणेश पाटील, सहाय्यक आयुक्त जयदत्त भंवर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT