अमरावती : अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात आज दुपारी एक धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार, २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी हा मेल आला होता, ज्यामध्ये दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी कोर्ट इमारत उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर तत्काळ अमरावती पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण कोर्ट परिसर पूर्णपणे खाली करण्यात आला असून न्यायाधीश, वकील आणि नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे कोर्टाचे सर्व कामकाज ठप्प झाले होते.
घटनास्थळी बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक आणि कमांडो पथकाने तातडीने धाव घेतली. या पथकांकडून न्यायालयाच्या चारही मजल्यांची आणि प्रत्येक कोपऱ्याची अत्यंत बारकाईने तपासणी करण्यात आली. अमरावतीसह राज्यातील इतर न्यायालयांनाही अशाच प्रकारे धमकीचे ई-मेल मिळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण परिसरात उच्च सतर्कता बाळगण्यात आली असून कसून तपास सुरू आहे.