अमरावती : रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका ३१ वर्षीय तरुणाला वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी 'ब्रेन डेड' घोषित केले. या अत्यंत दुःखाच्या प्रसंगातही कुटुंबीयांनी दाखवलेल्या धैर्यामुळे आणि घेतलेल्या अवयवदानाच्या मानवतावादी निर्णयामुळे तीन गरजू रुग्णांना नवे जीवन मिळाले आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील रहिवासी धीरज संतोष कलावते (वय ३१) याच्या कारला १२ ऑगस्ट रोजी शेंदूरजना खुर्द ते चांदूर रेल्वे मार्गावर अपघात झाला होता. या अपघातात धीरज गंभीर जखमी झाला. सुरुवातीला त्याला स्थानिक रुग्णालयात आणि त्यानंतर अमरावतीच्या 'रीम्स' (REEMS) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी १५ ऑगस्ट रोजी त्याला 'रेडियंट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल'मध्ये हलवण्यात आले; मात्र उपचारादरम्यान १८ ऑगस्ट रोजी डॉक्टरांनी त्याला 'ब्रेन डेड' घोषित केले.
मुलाच्या अकस्मात जाण्याने कलावते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या कठीण प्रसंगी डॉक्टरांनी कुटुंबीयांना अवयवदानाचे महत्त्व व प्रक्रिया समजावून सांगितली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत कुटुंबीयांनी धीरजचे अवयवदान करण्यास संमती दर्शवली.
बुधवारी सकाळी विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे अवयव संकलनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. धीरजच्या अवयवदानातून एक यकृत (Liver) आणि दोन मूत्रपिंडे (Kidneys) उपलब्ध झाली.
यातील यकृत नागपूरच्या 'न्यू इरा हॉस्पिटल'कडे, पहिले मूत्रपिंड नागपूरच्या 'किम्स किंग्जवे हॉस्पिटल'कडे, तर दुसरे मूत्रपिंड अमरावतीच्या 'रीम्स हॉस्पिटल'कडे प्रत्यारोपणासाठी सुपूर्द करण्यात आले.
डॉ. राहुल सक्सेना, डॉ. अशय सूर्यवंशी, डॉ. सिकंदर अडवाणी, डॉ. आनंद काकाणी यांच्यासह रेडियंट हॉस्पिटलच्या वैद्यकीय आणि तांत्रिक चमूने या प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावली. कलावते कुटुंबीयांच्या या संवेदनशील आणि धाडसी निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. एकाच व्यक्तीच्या अवयवदानामुळे तीन रुग्णांना नवजीवन मिळण्याची ही अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण घटना ठरली आहे.