अमरावती

Amravati News : दुःखाच्या महापुरातही माणुसकीचा दीप! ब्रेन डेड अ‍ॅड. मनीषा बडगे यांच्या अवयवदानाने ५ जणांना नवजीवन

यकृत, दोन्ही मूत्रपिंड आणि नेत्रदानामुळे पाच घरांमध्ये उजळला आशेचा दीप : बडगे-खोब्रागडे कुटुंबाचा संवेदनशील निर्णय

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : अपघाताच्या भीषण आघाताने आयुष्य क्षणात हिरावून घेतले, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला; तरीही अश्रू गिळून घेतलेल्या एका ऐतिहासिक आणि मानवतावादी निर्णयामुळे अमरावतीतील निष्णात वकील अ‍ॅड. मनीषा सागर बडगे (वय ४१) जाता-जाता पाच जणांना नवे आयुष्य देऊन गेल्या. मेंदूमृत (ब्रेनडेड) घोषित झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या अवयवदानाच्या धाडसी निर्णयामुळे अमरावतीच्या 'रिम्स' (RIMS) रुग्णालयात बुधवारी (दि. २८) अवयवदानाची ही अत्यंत भावूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

अमरावतीतील आदर्शनगर (मालटेकडी) येथील व्यंकटराव खोब्रागडे यांच्या कन्या आणि जळगावच्या सून असलेल्या अ‍ॅड. मनीषा बडगे या १७ ऑक्टोबर रोजी आपल्या माहेरी, आईला भेटण्यासाठी अमरावतीत आल्या होत्या. मात्र, काळाने वाटेतच घाला घातला. कॅम्प रोडवर सिटी बसने दिलेल्या जोरदार धडकेत त्या अत्यंत गंभीर जखमी झाल्या. सुरुवातीला इर्विन व सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारांचे प्रयत्न झाले; मात्र स्थिती नाजूक असल्याने त्यांना बडनेरा रोडवरील रिम्स रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉ. स्वरूप गांधी आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने मनीषा यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर मंगळवारी सायंकाळी ५:४१ वाजता डॉक्टरांनी त्यांना औपचारिकरीत्या 'मेंदूमृत' घोषित केले.

दुःखाच्या क्षणी माणुसकीचा दीप आणि 'ग्रीन कॉरिडॉर'

डोळ्यांसमोर संसार उद्ध्वस्त होत असताना पती प्रा. सागर बडगे आणि भाऊ नीलेश खोब्रागडे यांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवून एका व्यापक सामाजिक भावनेतून अवयवदानाचा महान निर्णय घेतला. त्यांच्या या एका शब्दाने पाच गरजू रुग्णांना जीवनदान मिळाले. 'जीवनज्योत' आणि 'हरिना फाउंडेशन'च्या समन्वयातून ही प्रक्रिया पार पडली.

अवयव तातडीने नागपूर आणि सावंगी मेघे (वर्धा) येथे पोहोचवण्यासाठी अमरावती शहर वाहतूक पोलिसांनी तत्परतेने 'ग्रीन कॉरिडॉर' तयार करून दिला. आपल्या अकाली जाण्याने सर्वांचे डोळे पाणावून टाकणाऱ्या अ‍ॅड. मनीषा यांनी मृत्यूनंतरही पाच जणांच्या रूपात आपले अस्तित्व जिवंत ठेवले आहे. संकटाच्या काळात बडगे आणि खोब्रागडे कुटुंबीयांनी दाखवलेल्या या असीम दातृत्वाचे सर्वत्र अत्यंत आदरपूर्वक कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT