अमरावती : विदर्भातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या अंबादेवी शैलाशय परिसरात एक ऐतिहासिक शोध लागला आहे. या परिसरातील गुहाचित्रे सुमारे ३५,००० वर्षे जुनी असल्याचा दावा नव्या संशोधनातून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अश्मयुगीन आदिमानवाची ही भारतातील सर्वात मोठी वसाहत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, या शोधामुळे भारताचा प्रागैतिहासिक इतिहास जागतिक स्तरावर नव्याने लिहिला जाण्याची चिन्हे आहेत.
अमरावती येथील सहा निसर्ग संशोधकांनी २००७ मध्ये सर्वप्रथम या शैलाश्रयांचा शोध लावला होता. मंगुसादेव शैलाश्रयातील चित्रांचा सखोल अभ्यास करताना संशोधकांना एका लांब मानेच्या धावत्या पक्ष्याचे चित्र आढळले, जे हुबेहूब शहामृगासारखे दिसते. भारतात २४,००० ते ४२,००० वर्षांपूर्वी शहामृग अस्तित्वात होते, हे यापूर्वीच वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. त्यामुळे, आदिमानवाने प्रत्यक्ष निरीक्षणातूनच हे चित्र रेखाटले असावे, असा खंबीर निष्कर्ष डॉ. व्ही. टी. इंगोले आणि त्यांच्या चमूने मांडला आहे.
या गुहेत केवळ शहामृगच नाही, तर जिराफवंशीय 'शिवाथेरियम', लांब तोंडाचा कीटकभक्षी 'आर्डवर्क' आणि भारतीय गेंडा यांसारख्या झालेल्या प्राण्यांचीही चित्रे आढळली आहेत. सर्व चित्रे एकाच शैलीत असल्याने ती एकाच कालखंडातील असावीत, असा अंदाज आहे. रंगद्रव्यांच्या वैज्ञानिक चाचण्या पूर्ण झाल्यास, ही भारतातील आजवरची सर्वांत प्राचीन गुहाचित्रे ठरू शकतात.
इतका मोठा ऐतिहासिक ठेवा समोर येऊन १९ वर्षे उलटली, तरी या स्थळाला अद्याप अपेक्षित शासकीय दर्जा मिळालेला नाही. हा परिसर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असल्याने दोन्ही राज्यांच्या प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) पुढाकार घेऊन या स्थळाला 'युनेस्को जागतिक वारसा' दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अमरावती विद्यापीठात या संशोधनावर आधारित संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून धूळ खात पडला आहे.
हा शोध लावणारे मुख्य संशोधक डॉ. व्ही. टी. इंगोले, प्र. सु. हिरुरकर, पद्माकर लाड, डॉ. मनोहर खोडे, शिरीष कुमार पाटील यांनी या स्थळाच्या संवर्धनासाठी साकडे घातले आहे. जर येथे माहिती केंद्र, रस्ते आणि पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर हा वारसा जगासमोर येईल. अंबादेवी येथील ही गुहाचित्रे केवळ विदर्भाचा नव्हे, तर भारताचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा आहे. आता गरज आहे ती केवळ इच्छाशक्तीची, जेणेकरून ३५ हजार वर्षांपूर्वीचा आपला इतिहास सुरक्षित राहील, असे संशोधकांचे म्हणणे आहे.