Amravati Nagpur Highway Two-Wheeler Collision
अमरावती: नागपूरवरून अमरावतीकडे जाणार्या भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिली.या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. २७) रात्री ७ वाजता अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा वरखेड फाट्यानजीक घडली.
निखिल राजेंद्र बोके (वय ३५),कैलास मनोहर कळंबे (वय ३३ ) दोघेही रा. उंबरखेड असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
मृतक निखिल बोके व कैलास कळंबे हे दोघेही तिवसा येथून आपल्या गावी एकाच दुचाकीने जात होते. यावेळी एमएच १४ एलक्स १३२० क्रमांकाची पर्पल कंपनीची ट्रॅव्हल्स ही नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने जात होती. याच दरम्यान महामार्ग ओलाडून वरखेड फाट्याकडे आपल्या दुचाकीने जात असताना ट्रॅव्हल्सची जबरदस्त धडक दुचाकीला बसली.
यात घटनास्थळीच निखिल बोके व कैलास कळंबे यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.ट्रॅव्हल्ससह चालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
मृत कैलास कळंबे यांची पत्नी ही आठ महिण्याची गर्भवती असून पुढील महिण्यातच पत्नीच्या प्रसुतीची तारीख होती. कुटुंबात लवकरच आंनदाचे वातावरण येणार होते, अशातच पतीच्या निधनाची माहिती कुटुंबाला मिळाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतक कळंबे यांच्या पच्छात आई, वडिल, एक मुलगी तर निखिल बोके यांच्या पश्श्चात आई, वडिल आहेत.