अमरावती

Amravati Murder : भारवाडी हत्याकांडाचा राजकोट कनेक्शनसह उगलडा; जुन्या वैमनस्यातून मित्रांनीच रचला होता खुनाचा कट

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारवाडीनजीक झालेल्या ३० वर्षीय विमल संतोष अग्रावत याच्या निर्घृण हत्येचा छडा लावण्यात अमरावती ग्रामीण पोलिसांना मोठे यश आले आहे. राजकोट येथील या तरुणाची हत्या त्याच्याच दोन मित्रांनी जुन्या वादातून आणि टोकाच्या वैमनस्यातून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत गोपनीयतेने तपास चक्रे फिरवत गुजरातच्या राजकोट येथून दोन संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

२० फेब्रुवारी रोजी भारवाडी येथील आयआरबी ट्रक ले-बाय परिसरात विमल अग्रावत या तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला होता. विमलची धारधार चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांना तपासासाठी रवाना केले होते. तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचे धागेदोरे शोधले.

सूडाची भावना आणि हत्येचा कट

पोलिसांनी या प्रकरणी माहिर माजीदभाई सोलंकी (वय २२, रा. हुसेनी चौक, राजकोट) आणि राज वहिदभाई चव्हाण (वय २२, रा. नानावटी चौक, राजकोट) या दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. मृत विमल आणि आरोपींमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तीव्र संघर्ष सुरू होता. डिसेंबर २०२५ मध्ये विमलच्या अल्पवयीन बहिणीला राज चव्हाणच्या नातेवाईकाने पळवून नेले होते, ज्यामध्ये 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात राज आणि माहिर यांनी मदत केल्याचा संशय विमलला होता, त्यामुळे त्यांच्यात वारंवार खटके उडत होते.

पैशांची मागणी आणि पेटवलेली कार

पोक्सोच्या या प्रकरणावरून विमल आरोपींकडे पैशांची मागणी करत होता. पैसे न मिळाल्यास तो त्यांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत असे. हा वाद इतका विकोपाला गेला की, विमलने १४ फेब्रुवारी रोजी राज चव्हाणची चारचाकी गाडी त्याच्या घरासमोरच पेटवून दिली होती. विमल आपला 'गेम' करू शकतो, अशी भीती आरोपींना वाटू लागली होती. याच भीतीपोटी आणि झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी राज आणि माहिर यांनी विमलचा काटा काढण्याचे ठरवले.

सापळा रचून भारवाडीत शेवट

तडजोड करण्याच्या बहाण्याने आरोपींनी विमलशी संपर्क साधला आणि त्याला अमरावतीतील भारवाडी येथे गाठले. संधी मिळताच त्यांनी धारधार चाकूने विमलवर वार करून त्याची हत्या केली आणि तातडीने गुजरातला पसार झाले. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली 'जीजे ०३ पिडी ०९११' क्रमांकाची कार देखील जप्त केली आहे.

तपास पथकाची कामगिरी

हा अत्यंत गुंतागुंतीचा तपास पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, तिवसा पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, पीएसआय अमोल मुडे व त्यांच्या संपूर्ण पथकाने, तसेच सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT