अमरावती : दर्यापूर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आनंदनगर भागात आज रविवारी (दि.१७) दुपारी एक वाजताच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. किरकोळ वाद आणि गैरसमजातून एका २१ वर्षीय युवकाने आपल्या १९ वर्षीय मित्राची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. प्रजल देवानंद तायडे (वय १९) असे मृत युवकाचे नाव असून, कुणाल प्रवीण गावंडे (वय २१) असे आरोपीचे नाव आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण दर्यापूर शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रजल आणि कुणाल यांच्यात काही कारणावरून वाद आणि गैरसमज निर्माण झाले होते. आज दुपारी याच वादाचे पर्यावसान मोठ्या भांडणात झाले. राग अनावर झाल्याने आरोपी कुणाल गावंडे याने प्रजलवर धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रजल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे उपचारासाठी नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अवघ्या १९ वर्षांच्या तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अवघ्या दोन तासांच्या आत आरोपी कुणाल गावंडे याला आनंदनगर भागातून अटक केली. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत असले, तरी शांत मानल्या जाणाऱ्या दर्यापूर शहरात भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
युवकांमध्ये वाढती हिंसक प्रवृत्ती, किरकोळ कारणांवरून होणारे जीवघेणे हल्ले आणि शस्त्रांचा वापर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी आता कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या घटनेमुळे मृत प्रजलच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरात शोककळा पसरली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता अमरावती येथील फॉरेन्सिक टीम देखील दर्यापुरात दाखल झाली असून, दर्यापूर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.