अमरावती : अमरावती महापालिकेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शुक्रवारी 16 जानेवारी रोजी मतमोजणीत धक्कादायक निकाल समोर आले आहे. महापालिकेच्या 22 प्रभागातील 87 जागांपैकी 25 जागा जिंकून भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला. मात्र, मागील 45 जिंकलेल्या जागांचा विचार करता भाजपला मतदारांनी नाकारल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे युवा स्वाभिमान 15+ जागा जिंकून भाजपनंतर दुसरा मोठा पक्ष ठरला आहे.
या खालोखाल काँग्रेसने आपले 15 नगरसेवक निवडून आणले आहे. तर आश्चर्यकारकरीत्या मागील 10 जागा वरून असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने 12 जागांवर विजय मिळविला आहे.
खोडके दांपत्याच्या नेतृत्वात राष्ट्रवादी अजित पवार गटाने एकूण 87 जागा लढवूनही केवळ 11 जागा मिळविल्या. बहुजन समाज पक्षाने 3 जागेवर मुसंडी मारली आहे. शिवसेना ठाकरे गट 2 जागी, तर शिवसेना शिंदे गट 3 जागी विजय ठरले. या निवडणुकीत वंचित ने देखील एक नगरसेवक निवडून आणला आहे.
एकूणच हे सर्व निकाल धक्कादायक असून 87 नगरसेवक असलेल्या महापालिकेत बहुमतासाठी 45 चा आकडा भाजप कसा जुळविणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. किंवा वेगळे समीकरण महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी जुळून येणार का हे देखील पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भाजपला सत्ता स्थापनेसाठी युवा स्वाभिमान ला किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घ्यावे लागणार आहे. युवा स्वाभिमान पक्ष सत्ता स्थापनेत निर्णायक ठरणार आहे. महापालिकेच्या 87 जागेसाठी झालेल्या या निवडणुकीत 22 प्रभागात एकूण 661 उमेदवार रिंगणात होते.
एकूण जागा - 87
प्रभाग - 22
एकूण उमेदवार - 661
भाजपा - 25
शिवसेना - 3
राष्ट्रवादी -11
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) - 0
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - 2
मनसे - 0
काँग्रेस - 15
एमआयएम - 12
बसपा-3
वंचित - 1
युवा स्वाभिमान पार्टी - 15