Morshi Municipal Council Rooftop Mutton Party Pudhari
अमरावती

Amravati Crime | मोर्शी नगरपरिषदेच्या छतावरील मटण पार्टीचे ड्रोन शूटिंग करणाऱ्यावर हल्ला

शिंगोरा रोड परिसरात पाच ते सहा जणांनी रमाकांत गावंडे यांच्यावर हल्ला

पुढारी वृत्तसेवा

Morshi Municipal Council Rooftop Mutton Party

अमरावती : मोर्शी नगरपरिषदेच्या छतावरील कथित मटण पार्टीचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. या पार्टीचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करणार्‍या व्हिडिओ शूटरवरच धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री (दि.१७) समोर आली आहे. 

शिंगोरा रोड परिसरात पाच ते सहा जणांनी रमाकांत गावंडे यांच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती असून, या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अमरावतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांनी मटण पार्टी केल्याचा कथित प्रकार ड्रोन चित्रीकरणातून समोर आला होता.

या घटनेमुळे नगरपरिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या पार्टीचे चित्रीकरण करणारे व्हिडिओ शूटर रमाकांत गावंडे यांच्यावरच हल्ला झाल्याने या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मोर्शीतील शिंगोरा रोड परिसरात खुल्या कारागृहासमोर ही घटना घडली. पाच ते सहा जणांनी गावंडे यांना गाठून धारदार शस्त्राने वार केल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अमरावतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जबाबानंतर गुन्हा दाखल करणार

रमाकांत गावंडे यांच्यावर शिंगोरा रोड परिसरात हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, पाच ते सहा जण या हल्ल्यात सहभागी होते. जखमीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांचा जबाब नोंदविल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT