Melghat Women Solar Charkha Pudhari
अमरावती

Melghat Handcrafted Shawl | महिलांनी सौर चरख्यावर साकारली मेळघाटची कला; विशेष शाल पीएम मोदींना भेट

विशेष शाल पंतप्रधान मोदी यांना एका गौरवपूर्ण समारंभात स्वागतस्वरुपात प्रदान करण्यात आली

पुढारी वृत्तसेवा

Melghat Women Solar Charkha

अमरावती : जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल मेळघाट क्षेत्रातील महिला कारागिरांनी सौरऊर्जेवर चालणाऱ्या चरख्याच्या साहाय्याने पारंपरिक,आधुनिक व पर्यावरण पुरकतेला कौशल्याचा साज चढवून तयार केलेली एक विशेष शाल सोमवारी २ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका गौरवपूर्ण समारंभात स्वागतस्वरुपात प्रदान करण्यात आली.हा प्रसंग म्हणजे मेळघाटातील आदिवासी महिलांचे कौशल्य व आत्मनिर्भरता अधोरेखित करणारा थेट राष्ट्रीस्तरावरील बहुमानच ठरला आहे.

दुर्गम व आव्हानात्मक भौगोलिक परिस्थिती असूनही मेळघाटच्या महिलांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेतलेली ही झेप कौतुकास्पद ठरत असून, त्यांच्या या हस्तकलेने देशाच्या पटलावर अमरावती जिल्ह्याचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे नाव पुन्हा एकदा अभिमानाने उंचावले आहे. दिल्लीतील भारत मंडपम येथे २ नोव्हेंबर रोजी ‘भारत रिन्युअल एनर्जी समिट २०२६’ या  गौरवपूर्ण आयोजनाच्या उद्घाटन सोहळ्यात स्वागत स्वरुपात मेळघाटातील खादी ग्रामोद्योगाच्या 'कुटीर' ब्रँडतर्फे तयार करण्यात आलेली आकर्षक नैसर्गिक पानांच्या ठश्यांची  सौर चरखा शाल पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांना केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा  मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते भेट करण्यात आली. २ ते ५ नोव्हेंबर दरम्यान आयोजित या परिषदेत १३० हून अधिक देशांचे प्रतिनिधी, ४० हून अधिक मंत्री, धोरणकर्ते, उद्योजक, गुंतवणूकदार, संशोधक आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या पुढाकारातून सुरु करण्यात आलेला अमरावती विकेंद्रित सौर चरखा क्लस्टर हा ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना स्थानिक पातळीवर शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी कस्तुरबा सोलर खादी महिला समिती या महिलांच्या संस्थेमार्फत करण्यात येत आहे. संस्थेने मेळघाटातील ग्रामीण व आदिवासी महिलांना सौर चरख्याद्वारे सूतनिर्मिती, हातमागाद्वारे वस्त्रनिर्मिती तसेच वस्त्रांवरील विविध कलात्मक प्रक्रिया यांसाठी प्रोत्साहित करून त्यांना रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

मेळघाटातील महिलांनी विशेष कलाकुसरीतून साकारलेली ही विशेष शाल म्हणजे पारंपरिक हस्तकला आणि आधुनिक नवोपक्रम, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक कारागिरांच्या आत्मनिर्भरतेचा एक उत्तम संगम आहे. दुर्गम भागात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक आणि हरित ऊर्जेचा वापर करून महिलांनी हे सूत कताईचे काम केले आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे केवळ कार्बन फूटप्रिंट कमी होण्यास मदत झाली नाही, तर खादी आणि हस्तकलेला एक आधुनिक, डिजिटल व शाश्वत स्वरूप मिळाले आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक आदिवासी कारागिरांचे कौशल्य आणि महिला बचत गटांच्या आर्थिक स्थैर्याला थेट प्रोत्साहन मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' आणि 'व्होकल फॉर लोकल' या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवणारी ही कामगिरी ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT