MBBS Admission Scam
अमरावती : मुलीला डॉक्टर बनविण्याच्या पालकांच्या स्वप्नाचा गैरफायदा घेत एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत अमरावतीतील एका दुग्ध व्यावसायिकाकडून तब्बल २९ लाख १० हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी इंदोर येथील एका महिला डॉक्टरसह सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू केला आहे.
गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओम कॉलनी येथील रहिवासी सोनल हरीराज तिवारी यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या मुलीने जून २०२४ मध्ये नीट परीक्षा दिल्यानंतर कमी गुण असूनही छत्तीसगडमधील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात मॅनेजमेंट कोट्यातून एमबीबीएस प्रवेश निश्चित करून देण्याचा दावा आरोपींनी केला होता. त्यासाठी विविध टप्प्यांत मोठी रक्कम भरण्यास सांगण्यात आले.
आरोपींच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून तिवारी यांनी एकूण २९.१० लाख रुपये दिले. मात्र, प्रवेश प्रक्रिया पूर्ण न करता आरोपींनी वेळोवेळी नवीन कारणे सांगून जवळपास दोन वर्षे टाळाटाळ केली. अखेर प्रवेशही मिळाला नाही आणि दिलेली रक्कमही परत करण्यात आली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तिवारी यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
तक्रारीच्या आधारे गाडगेनगर पोलिसांनी सौरभ कुमार गुप्ता, अमन कुमार, रणधीर कुमार, सतीश गोस्वामी, निखिल सिंह, चंदन चौधरी यांच्यासह सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी हे मध्य प्रदेशातील इंदोर येथील रहिवासी असल्याची माहिती तक्रारदाराने दिली आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, बँक खात्यांमधील देवाणघेवाण तसेच प्रवेशाच्या नावाखाली झालेल्या व्यवहारांची कागदपत्रे तपासली जात असून पुढील तपास सुरू आहे.