अमरावती : अमरावतीमध्ये एका मद्यधुंद पतीने आपल्या पत्नीवर पेट्रोलने भरलेली प्लॅस्टिकची कॅरीबॅग फेकून लायटरने आग लावल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१९ सप्टेंबर) रात्री घडली. या हल्ल्यात महिला गंभीररित्या भाजली असून, तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घटनेनुसार, पती शरिफ खान पठाण (रा. अमरावती) याला दारूचे व्यसन असल्यामुळे त्याची पत्नी मुलांसह वेगळ्या घरात राहायला गेली होती. मात्र, घटनेच्या दिवशी शरिफ खान तिच्या घरी आला आणि त्याने पेट्रोलने भरलेली कॅरीबॅग तिच्या अंगावर फेकली व लायटरने पेटवून दिले. यात महिलेची पाठ, मांडी, उजवा हात, आणि दोन्ही कान गंभीररित्या भाजले असून, तिचे कपडेही जळाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी शरिफ खान पठाणविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.