अमरावती

Amravati Honey Trap : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ६४ वर्षीय शेतकऱ्याची ७० लाखांची लूट! बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देऊन फसवले

आरोपी महिलेने शेतकऱ्याशी जवळीक वाढवून त्यांना भावनिक जाळ्यात ओढले...

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील एका ६४ वर्षीय शेतकऱ्याला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून आर्थिकदृष्ट्या अक्षरशः उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी एका दाम्पत्याविरुद्ध खंडणी, धमकी आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा बुधवारी (दि. १३) दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

अशी झाली ओळख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दाम्पत्याचे मोबाइल रिचार्ज व विक्रीचे दुकान होते. शेतकरी वारंवार त्या दुकानात जात असल्याने त्यांची ओळख निर्माण झाली. सुरुवातीला आरोपी पतीने विश्वास संपादन करण्यासाठी शेतकऱ्याकडून १० हजार रुपये उसने घेतले आणि ते वेळेत परतही केले. यानंतर आरोपी महिलेने शेतकऱ्याशी जवळीक वाढवून त्यांना भावनिक जाळ्यात ओढले. मार्च २०२० मध्ये दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.

धमकावून उकळली खंडणी

काही काळानंतर शेतकऱ्याने हे संबंध तोडण्याचा प्रयत्न करताच या प्रकरणाला ब्लॅकमेलिंगचे स्वरूप प्राप्त झाले. “माझ्याकडे तुझे फोटो, चॅटिंग आणि कॉल रेकॉर्डिंग आहेत,” अशी धमकी देत आरोपी महिलेच्या पतीने शेतकऱ्याला पैशांसाठी धमकावण्यास सुरुवात केली. पत्नी आणि नातेवाईकांसमोर बदनामी करण्याची, तसेच बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली. या भीतीमुळे वृद्ध शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली गेला आणि आरोपींच्या मागणीनुसार पैसे देत राहिला.

७० लाखांचा हिशोब

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२० ते नोव्हेंबर २०२४ या चार वर्षांच्या कालावधीत आरोपींनी शेतकऱ्याकडून सुमारे २५ लाख रुपये रोख घेतले. याशिवाय १ लाख, २ लाख आणि एकदा १० लाख रुपयांचे चेक वटवण्यात आले. आरोपी महिलेने स्वतःच्या नावे वेळोवेळी ५० हजार ते २ लाख रुपयांपर्यंतचे धनादेश (चेक) घेतल्याची माहितीही समोर आली आहे. एकूण उकळपट्टीचा आकडा तब्बल ७० लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

पोलिस कारवाई

सततच्या आर्थिक आणि मानसिक छळामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने अखेर एका परिचिताच्या सल्ल्याने नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती-पत्नीविरुद्ध जबरी वसुली, धमकी आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून सर्व आर्थिक व्यवहार, धनादेश आणि डिजिटल पुराव्यांची पडताळणी सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यात येत असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.
— दिनेश दहातोंडे (ठाणेदार, नांदगाव पेठ)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT