अमरावती : कुटुंबातील अल्पवयीन मुलीसोबत बोलतो म्हणून एका १८ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी (दि.११) गांधी आश्रम चौक परिसरामध्ये समोर आली. नयन नरेंद्र वायधने (वय १८, हनुमान नगर, पोलीस चौकी जवळ अमरावती) असे मृतक तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन महिलांना ताब्यात घेतले असून हत्या करणार्या आरोपी दोन भावांचा पोलीस शोध घेत आहे.
अधिक माहिती अशी की, मृत नयन नरेंद्र वायधने रविवारी दुपारी पायदळ गांधी आश्रम चौकात आला होता. यावेळी परिसरातून एका उमेदवाराची प्रचार रॅली निघाली होती. त्यामुळे नयन तेथे थांबला होता. अशात आरोपी दीपक ईश्वर तायडे (वय ३५) आणि त्याचा भाऊ सागर ईश्वर तायडे (दोन्ही राहणार गांधी आश्रम) यांनी जुन्या वादात नयनवर चाकूने हल्ला केला. नयनच्या पाठ, पोटवर आरोपींनी चाकूने सपासप ७-८ वार केले. यामुळे नयन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. आरोपी तेथून फरार झाले.
घटनेची माहिती खोलापुरी गेट पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी नयनला गंभीर अवस्थेमध्ये जिल्हा सामान रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला तपासताच मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच डीसीपी श्याम घुगे ,गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजीराव बचाटे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि क्यूआरटी पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिसराचे निरीक्षण केले. फॉरेन्सिक टीमला पण बोलविण्यात आले होते. पोलिसांनी पंचनामा करून पोस्टमार्टम नंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. आरोपींंचा युद्धस्तरावर शोध घेतला जात आहे.
माहितीनुसार आरोपींच्या परिचयातील एका अल्पवयीन मुलीसोबत मृतक नयन वायधनेची ओळख होती. दोघेही एकमेकांशी बोलत होते. मात्र मुलीच्या घरच्यांना नयनचे मुलीसोबत बोलणे पटत नव्हते. त्यांनी दोघांनाही समजावले होते. यावरूनच आधीही वाद देखील झाला होता. दरम्यान रविवारी पुन्हा नयन दिसताच आरोपींनी त्याच्यावर प्राण घातक हल्ला केला.
मृतकही गुन्हेगारी प्रवृत्तीचा
मृतक नयन वायधने वर प्राणघातक हल्ला करण्याचा गुन्हा दाखल आहे. त्यावेळी तो अल्पवयीन होता. यामुळे तो एका महिन्यानंतर बालसुधार गृहातून बाहेर आला होता. यापूर्वीही त्याच्यावर काही प्रकरणं दाखल आहेत. मृतक आणि आरोपी दीपक तायडे यांच्यात पूर्वी वाद झाला होता. या वादामुळे त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.