अमरावती

अमरावती : व्हीएमव्ही परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्याचे वनमंत्र्यांचे आदेश

निलेश पोतदार

अमरावती ; पुढारी वृत्‍तसेवा अमरावती शहरातील व्हीएमव्ही कॉलेज परिसरात मागील दोन महिन्यांपासून बिबट्याचा संचार आहे. त्‍यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशत व भीती निर्माण झाली आहे. या बिबट्याला तत्काळ जेरबंद करण्याचा मुद्दा अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला. दरम्यान या संदर्भात राज्याचे वन मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनही सादर केले. याची तत्काळ दखल घेत अमरावतीत व्हीएमव्ही भागातील बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाला दिले आहे.

शहरी भागातील व्हीएमव्ही परिसरात मागील दोन महिन्यापासून बिबट्याचा संचार असून, रहिवाशी भागातही बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशत आहे. या संदर्भात आ.सुलभा खोडके यांनी मागील ८ ऑक्टोबर २०२३ रोजी स्थानिक भागात वन कर्मचाऱ्यांसमवेत भेट देऊन बिबट्याला जेरबंद करण्याची सूचना केली होती. यावेळी बिबट्याचा शोध लागला नव्हता. या नंतर दहा दिवसांनी पुन्हा मणिपूर लेआऊट भागात बिबट्याने उपद्रव घातला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आ. खोडके यांनी डीएफओ मिश्रा यांच्याशी संपर्क साधून बिबट्याला तत्काळ जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू पथक तैनात करून प्रभावी व सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत सूचना देखील केली होती. मात्र तरीही दोन महिन्यापासून बिबट्याला पकडण्याबाबत वन विभागाने प्रभावी कार्यवाही केली नसल्याने तो बिबट्या व्हीएमव्ही परिसरातच तळ ठोकून आहे.

जीवितहानी उद्भभवल्यास जबाबदार कोण?

स्थानिक विद्यार्थी, नागरिक व महिला यांचे घराबाहेर जाणे धोक्याचे झाले आहे. रात्रीला बिबट्या व्हीएमव्ही परिसरात संचार करत असल्याने या पासून जीवितहानी झाल्‍यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न आ. खोडके यांनी हिवाळी अधिवेशनात लावून धरली. तसेच या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाला आदेशित करण्याची मागणी त्‍यांनी केली होती. तसेच राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्रही दिले होते. यावर आता ना. सुधीर मुनगंटीवार यांनी त्वरित आदेश काढण्यासंदर्भात निर्देशित केले आहे. त्यामुळे अमरावती वन विभाग, उपवनसंरक्षक कार्यालयाने याबाबत कार्यवाहीच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT