अमरावती

Amravati Food Poisoning: अमरावतीत अन्नातून विषबाधा; आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू

महर्षी पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांना विषबाधा; शाळा प्रशासनाच्या कथित बेजबाबदारपणामुळे पालकांमध्ये संताप

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : येथील महर्षी पब्लिक स्कूल या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेत इयत्ता अकरावीतील विद्यार्थी राजेश बेठेकर (रा. करंजखेडा, ता. चिखलदरा) याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. आजारी विद्यार्थ्यांना वेळीच रुग्णालयात दाखल न करता गावी पाठविण्यात आल्याचा आरोप होत असल्याने शाळा प्रशासनाविरोधात पालक आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

१४ ऑगस्ट रोजी शाळेतील अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याऐवजी शाळा प्रशासनाने त्यांना मेळघाटातील त्यांच्या मूळ गावी पाठवून दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर राजेश बेठेकर याची प्रकृती अधिक खालावली. १६ ऑगस्ट रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला. राजेशचा चुलत भाऊ रामप्रसाद याच्यावर चुरणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच अन्य पाच आजारी विद्यार्थ्यांवर अमरावतीतील राजापेठ परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, १४ ऑगस्ट रोजी गावी जाताना राजेशची प्रकृती उत्तम होती. तसेच त्याच्या १६ ऑगस्ट रोजी झालेल्या मृत्यूची माहिती १७ ऑगस्ट रोजी मिळाल्याचा दावा शाळा प्रशासनाने केला आहे. मात्र, आजारी विद्यार्थ्यांना नियमानुसार शासकीय रुग्णालयात दाखल न करता खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याने पालकांनी संशय व्यक्त केला आहे.

चौकशी करून कारवाईचे निर्देश

दरम्यान, आदिवासी विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त ममता विधळे यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची तातडीने भेट घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच शाळा प्रशासनाकडून घटनेचा सविस्तर अहवाल मागवून दोष आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक आणि सामाजिक संघटनांकडून होत आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT