जिल्हा आपत्ती प्रतिसाद टीम (DDRF) टीमने मृतदेह शोधून काढले 
अमरावती

Amravati Drown news | रिल्सचा नाद जीवावर बेतला : घातखेडा बंधाऱ्यात बुडून बहीण - भावासह चार जणांचा मृत्यू 

रील काढण्याच्या नादात चार जणांचा बुडून मृत्‍यू : 'डब्बा पार्टी' करण्यासाठी गेले होते बंधाऱ्यावर

पुढारी वृत्तसेवा

अमरावती:फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीतील घातखेडा बंधाऱ्यात रविवारी (१०) दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. मौजा घातखेडा येथील बंधाऱ्यात फोटो आणि रील काढण्याच्या नादात एकूण चार जणांचा बुडून मृत्यू झाला.

यामध्ये बहीण भावांचा देखील समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण अमरावती परिसरात शोककळा पसरली आहे.प्राप्त माहितीनुसार, खोलापुरी गेट पोलीस ठाणे हद्दीतील महाजनपुरा परिसरातील नऊ तरुण-तरुणींचा गट गोडे कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या घातखेडा बंधाऱ्यात 'डब्बा पार्टी' करण्यासाठी गेला होता. जेवण झाल्यानंतर काही जणांना बंधाऱ्याच्या काठावर फोटो आणि रील बनवण्याची इच्छा झाली.

रील बनवत असताना एकाचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले इतर तिघेही एकामागून एक पाण्यात बुडाले. पाण्याचा अंदाज न आल्याने या चारही जणांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालयाची जिल्हा आपत्ती प्रतिसाद टीम (DDRF) तातडीने घटनास्थळी रवाना झाली.

टीममधील संतोष डोईफोडे, निशांत राठोड, राजेश गजबे, सचिन धरमकर आणि सागर माकोडे यांनी अथक परिश्रम घेत सायंकाळी चारही मृतदेह बाहेर काढले.या दुर्घटनेत सोनाली नरेंद्र जोशी (१६), आदित्य नरेंद्र जोशी (१२), पायल बबलू पंडित (२१) आणि यश गजानन काकणे (१३) या चौघांचा समावेश आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावंडांचा समावेश असल्याने जोशी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. फ्रेजरपुरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT