MLC Election Amravati Voting Stations Approved
वाशीम : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक-२०२६ साठी विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ८१ मतदान केंद्रे स्थापन करण्याच्या प्रस्तावाला भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. अमरावती विभागाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी ही माहिती दिली.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ८१ मतदान केंद्रे निश्चित करण्याचा प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला आयोगाने मंजुरी दिली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव तथा सहमुख्य निवडणूक अधिकारी यांनी पत्राद्वारे विभागीय आयुक्त कार्यालयाला कळविले आहे.
या निवडणुकीसाठी अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. जिल्हानिहाय मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली असून, अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक २५ मतदान केंद्रे असतील.
जिल्हानिहाय मतदान केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे आहे : अमरावती जिल्ह्यात २५, अकोला जिल्ह्यात १३, बुलढाणा जिल्ह्यात १८, वाशीम जिल्ह्यात ७ आणि यवतमाळ जिल्ह्यात १८ मतदान केंद्रे असतील. अशा प्रकारे संपूर्ण विभागात एकूण ८१ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत पाचही जिल्ह्यांतील मंजूर मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडेल. या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आल्याने निवडणूक प्रक्रियेच्या तयारीला महत्त्व प्राप्त झाले आहे.