Daryapur MLA Gajanan Lavate Office Theft
अमरावती : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांच्या जनसंपर्क कार्यालयालाच चोरट्यांनी लक्ष्य केल्याने खळबळ उडाली आहे. दर्यापूर कार्यालयातील शासकीय कागदपत्रे, नागरिकांनी विविध कामांसाठी दिलेली निवेदने तसेच सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर चोरून नेण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि.३०) समोर आली आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी सीसीटीव्ही यंत्रणेची तोडफोड करून डीव्हीआरच लंपास केल्याने या चोरीमागील उद्देशाबाबत अनेक तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. या प्रकरणी दर्यापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
आमदार कार्यालय हे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी मांडण्याचे महत्त्वाचे केंद्र आहे. विविध शासकीय कामे, विकासकामे, रस्ते, पाणी, विज, आरोग्य तसेच शेतकर्यांच्या प्रश्नांसंदर्भात नागरिकांकडून या कार्यालयात निवेदने दिली जातात. मात्र, याच कार्यालयातून नागरिकांची निवेदने आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरीला जाणे ही गंभीर बाब मानली जात आहे. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचे एकमेव आमदार म्हणून गजानन लवटे प्रसिद्ध आहे.
या घटनेतील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर चोरून नेण्यात आला आहे. कार्यालयात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी सीसीटीव्ही यंत्रणेची तोडफोड करून डीव्हीआर नेमका का लंपास केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही चोरी केवळ आर्थिक फायद्यासाठी करण्यात आली की कार्यालयातील काही महत्त्वाची कागदपत्रे किंवा माहिती मिळविण्याचा अथवा नष्ट करण्याचा उद्देश होता, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
पोलिसांच्या तपासातून चोरीमागील नेमका उद्देश, चोरट्यांची ओळख आणि चोरीला गेलेल्या साहित्याचा शोध लागणार का, याकडे दर्यापूरकरांचे लक्ष लागले आहे. पुढील तपास दर्यापूर पोलीस करत आहे.