Cyber ​​crime File Photo
अमरावती

Amravati Crime: 'तुमच्या खात्यात ६ लाख जमा झालेत..'; एका फोन कॉलने महिलेचे २.५९ लाख लुटले, नांदगाव खंडेश्वर पोलिसांत गुन्हा नोंद

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : आर्थिक मदत मिळणार असल्याचे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल २ लाख ५९ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वंदना (वय ५०, रा. देशमुखपुरा, नांदगाव खंडेश्वर, व्यावसायिक/संस्थाचालक) यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. 'तुमच्या एसबीआय (SBI) खात्यात आर्थिक मदत म्हणून ६ लाख रुपये पाठविण्यात आले आहेत. मात्र ही रक्कम मुंबई येथील एसबीआय कार्यालयात होल्डवर असून ती मिळवण्यासाठी काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल,' असे सांगून आरोपीने त्यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर आरोपीने विविध कारणे सांगून टप्प्याटप्प्याने फिर्यादीकडून २ लाख ५९ हजार रुपये स्वतःच्या खात्यात जमा करून घेतले. काही दिवसांनंतरही रक्कम न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने '१९३०' या सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली.

त्यानंतर नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात लिखित तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(सी) व ६६(डी) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास नांदगाव खंडेश्वर पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT