अमरावती

Amravati Crime : ऑनलाइन गेमिंगच्या आड ३ कोटींचा सायबर खेळ! अमरावती ग्रामीण पोलिसांची पुण्यात धडक कारवाई, तिघांना बेड्या

२९ एटीएम, २४ मोबाईल जप्त

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : जिल्ह्यातील नागरिकांच्या बँक खात्यांचा गैरवापर करून ऑनलाइन गेमिंग, बेटिंग आणि संशयास्पद व्यवहारांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या टोळीचा अमरावती ग्रामीण पोलिसांनी (दि. ५) पर्दाफाश केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माग काढत पोलिसांनी पुणे येथून तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून २४ मोबाईल, चार लॅपटॉप, २९ एटीएम कार्ड, १३ चेकबुक, सात पासबुक आणि १२ सिमकार्ड असा सुमारे ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आतापर्यंत सुमारे तीन कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

सायबर गुन्ह्यांची वाढती व्याप्ती लक्षात घेता अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत जनजागृती तसेच गुन्ह्यांच्या तपासावर विशेष भर देण्यात येत आहे. यादरम्यान शिरजगाव पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास अमरावती ग्रामीण सायबर पोलिसांकडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक माहितीचे सखोल विश्लेषण आणि बँक व्यवहारांची पडताळणी केली असता, गुन्ह्याचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने पुण्यातील धायरी परिसरातील यमुनाताई पोखळे नगर येथील 'अर्णव हाईट्स'मधील एका फ्लॅटवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी भूषण सुभाषराव दंडाळे (वय २३, रा. कुर्डी, पो. सुरळी, ता. वरुड), रोशननंद राजू दंडाळे (वय २८, रा. वॉर्ड क्र. १, सावंगा, ता. वरुड) आणि अंकित विठ्ठलराव मसुळे (वय २६, रा. वॉर्ड क्र. १, जरुड, ता. वरुड) या तिघांना अटक केली. या कारवाईनंतर या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता सातवर पोहोचली आहे. जप्त मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर ऑनलाइन गेमिंग, सट्टेबाजी तसेच डिजिटल व्यवहारांसाठी केला जात असल्याचे समोर आले आहे. या उपकरणांचे डिजिटल आणि फॉरेन्सिक विश्लेषण सुरू असून, त्यातून आर्थिक व्यवहार, संपर्क साखळी व अन्य साथीदारांची माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे.

तीन कोटींच्या व्यवहारांचा तपास

गुन्ह्यातील बँक खात्यांच्या व्यवहारांचे प्राथमिक विश्लेषण केले असता, आतापर्यंत सुमारे तीन कोटी रुपयांची सायबर फसवणूक उघड झाली आहे. संबंधित बँक खाती, व्यवहारांचे अंतिम लाभार्थी (End Beneficiaries) आणि या साखळीशी जोडलेल्या अन्य व्यक्तींचा शोध सुरू आहे. तपास जसजसा पुढे जाईल तसतसे आणखी मोठे आर्थिक व्यवहार आणि नवीन आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांनी बँक खाती व कागदपत्रे भाड्याने देऊ नयेत

"नागरिकांनी कोणत्याही आर्थिक आमिषाला बळी पडून आपले बँक खाते, एटीएम कार्ड, पासबुक, मोबाईल क्रमांक, सिमकार्ड किंवा बँकिंग तपशील अनोळखी व्यक्तींना वापरण्यास देऊ नयेत. अशा बँक खात्यांचा वापर सायबर फसवणूक, सट्टेबाजी अथवा बेकायदेशीर व्यवहारांसाठी केला जातो. कोणतीही सायबर फसवणूक किंवा संशयास्पद व्यवहार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन १९३० किंवा अमरावती ग्रामीण सायबर हेल्पलाइन ७०३०० ०६८५९ या क्रमांकावर संपर्क साधावा," असे आवाहन पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी केले आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यात सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुनील बन्सोड यांच्यासह सायबर पथकातील अंमलदारांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT