अमरावती : अमरावती शहर बुधवारी (दि.१५) सकाळी एका अत्यंत थरारक हत्याकांडाने हादरून गेले आहे. शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत भररस्त्यात अवघ्या काही मिनिटांत ४ ते ५ हल्लेखोरांनी २० वर्षीय अफाक शेख या तरुण मित्राची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण अमरावतीत भीतीचे वातावरण पसरले आहे.
मृत अफाक शेख हा अमरावतीमधील ताजनगर परिसरातील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. १५) सकाळी साडेआठच्या सुमारास विजय कॉलनी परिसरातील एका कॅफेसमोर काही युवक आणि एक युवती गप्पा मारत उभे होते. काही वेळानंतर अफाक तिथे पोहोचला. सुमारे १५ ते २० मिनिटे त्यांच्यात चर्चा सुरू असताना अचानक वातावरण तापले आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
वादाचे पर्यवसान थेट रक्तरंजित हल्ल्यात झाले. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने प्रथम अफाकचा हातचा पंजा छाटला. गंभीर जखमी अवस्थेतही अफाकने जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, हल्लेखोरांनी भररस्त्यात त्याचा पाठलाग करून त्याला गाठले आणि त्याच्या मानेवर व शरीरावर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या अफाकचा जागीच मृत्यू झाला.
घटनेचा संपूर्ण थरार जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजमध्ये सुरुवातीला एक युवती आणि पाच युवक तिथे उपस्थित असल्याचे दिसते. त्यानंतर स्कुटीवरून आणखी काही युवक तिथे आले आणि त्यांनी अफाकवर हल्ला चढवला. अफाक जखमी अवस्थेत धावत असतानाही आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याची निर्घृण हत्या केली व घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच फ्रेझरपुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अफाकला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.