अमरावती : चारचाकी वाहनांची काच फोडून त्यातील मौल्यवान वस्तू लंपास करणार्या आंतरराज्यीय टोळीवर अमरावती शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील कुख्यात ‘नायडू गँग’मधील एका सराईत चोराला (दि.३०) अमरावतीत अटक केली आहे. या अटकेमुळे आयुक्तालय हद्दीतील चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
२१ डिसेंबर २०२५ रोजी राजापेठ व सिटी कोतवाली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सलग चार ते पाच वाहनफोडींच्या घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली होती. चारचाकी वाहनांची काच फोडून आत ठेवलेली नगदी रक्कम व लॅपटॉप चोरणे, ही या गुन्ह्यांची ठरावीक पद्धत होती. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. घटनांची पद्धत समान असल्याने हे गुन्हे एका टोळीचे असल्याचा संशय बळावला. त्यानुसार शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी स्वतः घटनास्थळांची पाहणी करत तपासाची दिशा निश्चित केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे या चोरीमागे नंदुरबार जिल्ह्यातील कुख्यात ‘नायडू गँग’चा हात असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान आरोपी बडनेरा रेल्वे स्टेशन परिसरात वावरत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून कार्तिक वालू नायडू (वय २७, रा. वाकीपाडा, पोस्ट करंजी खुर्द, ता. नवापूर, जि. नंदुरबार) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपीने आपल्या अन्य दोन साथीदारांसह राजापेठ व सिटी कोतवाली परिसरात चारचाकी वाहनांची काच फोडून चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन, तर सिटी कोतवालीतील एका गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ, गणेश शिंदे, श्याम घुगे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे यांच्यासह पोलीस हवालदार फिरोज खान, सतीश देशमुख, मंगेश लोखंडे, प्रशांत मोहोड, सैय्यद नाझीम, रंजीत गावंडे व चालक प्रभात पोकळे यांनी केली.