अमरावती :चांदूरबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोली काळे येथे एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात हरणाची शिकार करणार्या शिकार्यांनी झाडलेली गोळी एका शेतकर्याच्या मांडीत घुसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी १०:३० ते ११:०० वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली काळे येथील महेंद्र शंकरराव शिरसाट यांच्या शेतात प्रशांत गोवर्धनराव मोहोळ (वय ३५, रा. चिंचोली काळे) हे फवारणीचे काम करत होते. याचदरम्यान बंदूक हातात घेतलेले चार अज्ञात इसम हरणाची शिकार करण्याच्या उद्देशाने शेतात घुसले. शिकार्यांनी हरणांच्या कळपावर गोळी झाडली, मात्र दुर्दैवाने ती गोळी हरणाला न लागता शेतात काम करणार्या प्रशांत यांच्या मांडीत जाऊन घुसली.
आपल्याकडून शेतकरी जखमी झाल्याचे लक्षात येताच शिकार्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर आजूबाजूच्या शेतकर्यांनी तातडीने धाव घेत जखमी प्रशांत यांना उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.घटनेची माहिती मिळताच चांदूरबाजार पोलीस ठाण्याचे ठाणेदार सोनवणे यांनी तातडीने पावले उचलत जखमीचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांचे एक पथक अमरावती रुग्णालयाकडे रवाना केले. चांदूरबाजार पोलीस सध्या या अज्ञात शिकार्यांचा तीव्र शोध घेत आहेत.
मोठा अनर्थ टळला; वन विभागावर संताप
ही गोळी जर शेतकर्याच्या छातीवर किंवा डोक्यावर लागली असती, तर प्रशांत यांचा जागीच मृत्यू झाला असता आणि मोठा अनर्थ घडला असता. चिंचोली काळे, चांदूरबाजार आणि मोर्शी परिसरातील जंगलांमध्ये नीलगाय, हरण, रानडुक्कर आणि मोर यांसारख्या वन्यजीवांची मोठ्या प्रमाणावर अवैध शिकार केली जात आहे. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे शिकार्यांचे मनोबल वाढले असून ते आता थेट शेतात घुसून गोळीबार करण्यापर्यंत धजावले आहेत.
दरम्यान, घटनेच्या वेळी काही शेतकर्यांनी शिकार्यांचा व्हिडिओसुद्धा काढला असल्याचे समजते. या परिसरात वन्यजीव आणि शेतकर्यांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने चांदूरबाजार व मोर्शी भागात तत्काळ कडक बंदोबस्त आणि गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक शेतकर्यांकडून केली जात आहे.