Crime News Pudhari
अमरावती

Amravati Crime | मका टाकून बकर्‍यांची चोरी: कुख्यात टोळीचा पर्दाफाश; अकोल्यातील तिघा सराईतांना अटक 

ग्रामीण भागात बकर्‍या चोरण्यासाठी अनोखी शक्कल लढवणार्‍या टोळीला अटक

पुढारी वृत्तसेवा

Goat theft Amravati

अमरावती : ग्रामीण भागात बकर्‍या चोरण्यासाठी अनोखी शक्कल लढवणार्‍या टोळीचा अखेर पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आले आहे. मका टाकून बकर्‍यांना आमिष दाखवत गाडीत भरून चोरी करणार्‍या या टोळीत अकोल्यातील तिघा सराईतांना पोलिसांनी अटक केली आहे.

शेख नवाब शेख आशिक (वय २७), शेख रिजवान शेख गुलाब (वय ३२) आणि शेख सुमेर शेख लाला (वय २२, सर्व रा. अकोला) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या कारवाईत आरोपींकडून चोरीच्या बकर्‍या विकून मिळालेली सुमारे ४० हजारांची रोकड आणि २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अंजनगाव सुर्जी येथील तनवीर खान जमीर खान यांनी २७ फेब्रुवारी रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेजार्‍यांच्या मालकीच्या ४ मोठ्या व ३ लहान अशा एकूण ७ बकर्‍या (किंमत सुमारे ४४ हजार रुपये) दिवसाढवळ्या चोरीला गेल्या होत्या.

या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना एलसीबीचे पीएसआय मूलचंद भांबुरकर यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार अकोल्यातील वाशिम बायपासवरील हुसेनी सुपर शॉपी परिसरात सापळा रचण्यात आला. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असता चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली.

चौकशीत आरोपींनी बकर्‍यांना मका टाकून जवळ बोलावून, त्यांना वाहनात भरून पळवून नेत असल्याचे सांगितले. त्यांनी अंजनगाव सुर्जी परिसरातून एकूण ९ बकर्‍या चोरी केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईमुळे अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन स्वतंत्र चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, पुढील तपासासाठी आरोपींना संबंधित पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही यशस्वी कारवाई एलसीबी प्रमुख किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मूलचंद भांबुरकर व त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT