अमरावती,:शहरातील भानखेडा मार्गावरील जंगल परिसरात शनिवारी रात्री एक अत्यंत संतापजनक घटना घडली. एका तरुणीला आणि तिच्या मित्राला अडवून आधी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली, त्यांची लूट केल्यानंतर तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला.
या अमानुष घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी २८ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास पीडित तरुणी तिच्या मित्रासोबत अॅक्टिव्हा दुचाकीने भानखेडा गावाकडे जाणार्या रस्त्यावरून प्रवास करत होती. यावेळी निर्जन जंगल परिसरात पाच अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. आरोपींनी सुरुवातीला दोघांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे केवळ १२० रुपयांसाठी या टोळीने त्यांना लुटले.
मात्र, एवढ्यावरच न थांबता, एका आरोपीने तरुणीला जबरदस्तीने बाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवली आणि रविवारी २९ मार्च रोजी पाचही संशयित आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींविरुद्ध सामूहिक लैंगिक अत्याचार, लूटमार आणि मारहाणीच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.